श्वास घ्यायचा की नाही?; मुंबई प्रदूषणात हरवली! आरोग्याचा त्रास वाढण्याची शक्यता
By सचिन लुंगसे | Published: October 13, 2023 10:43 AM2023-10-13T10:43:34+5:302023-10-13T10:44:11+5:30
यात मुंबईच्या हवेची गुणवत्ता सतत खालावत आहे तर दिल्ली व लखनौच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे.
मुंबई : साधारण ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हवेची गुणवत्ता खालावत असून, २०१९ ते २०२३ या काळात देशातील सहा राज्यांच्या राजधान्यांमधील हवेची गुणवत्ता खालावत गेली आहे. यात मुंबईच्या हवेची गुणवत्ता सतत खालावत आहे तर दिल्ली व लखनौच्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली इमारतींची बांधकामे, रस्त्यांची कामे आणि वाहनातून होत असलेले प्रदूषण; या सगळ्या घटकांमुळे मुंबईवरल्या प्रदूषकांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून हवेतील धुळीकण, प्रदूषण, धूर, परागकण यामुळे मुंबईकरांना आरोग्याचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील ठीक ठिकाणच्या परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच प्रदूषकाचे प्रमाण वाढल्याने येथील दृश्यमानता कमी झाली होती. अगदी ३०० ते ५०० अंतरावर देखील दृश्य मान्यता कमी झाल्याने मुंबई प्रदूषणात हरवल्याचे चित्र होते.
हिवाळ्यात म्हणजे साधारण ऑक्टोबर ते मार्च दरम्यान दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, लखनऊ व पाटणा या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसते. प्रदूषणातील धुलीकण मानवी फुफ्फुसे, रक्तवाहिन्यांमध्ये शिरकाव करून हृदयाचे विविध आजार, हृदयविकार व श्वसनाच्या अन्य आजारांना कारणीभूत ठरू शकतात. देशातल्या सर्वाधिक १० प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली एनसीआर व बिहार राज्यातील ७ शहरांचा समावेश असून ही ७ प्रदूषित शहरे प्रामुख्याने गंगेच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेशात वसलेली आहेत. दिल्लीच्या हवेची गुणवत्ता किरकोळ सुधारली आहे पण १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ हा काळ पाहता दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून नोंदले गेले आहे.
२०१९ ते २०२२ या काळात मुंबई, बंगळुरू आणि कोलकाता या शहरात प्रदूषणाची पातळी वाढली.
प्रदूषणाचे स्रोत व हवामानाचे अन्य घटकांसंदर्भात सखोल पातळीवर अभ्यास करणे गरजेचे झाले आहे. जानेवारी - मार्च महिन्यात मुंबईत पीएम पातळीत अचानक झालेली वाढ कशामुळे झाली ? या प्रश्नांची उत्तरे मिळवावी लागणार आहेत.
- आरती खोसला, संचालक, क्लायमेट ट्रेंड्स
- बिहारची राजधानी पाटणाची हवेची गुणवत्ता गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्याने घसरली आहे.
- मिझोरामची राजधानी ऐझ्वालची हवेची गुणवत्ता सर्वाधिक चांगली आहे.
हवेची गुणवत्ता सुधारली का ?
२०१९ पासून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबविण्यात आला. हवेच्या गुणवत्तेत दीर्घकालीन सुधारणा, रेस्पायर अहवालाचा मागोवा घेतला असता असे दिसून येते की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनऊ व पाटणा या सहा राज्यांच्या राजधान्यांमध्ये २०१९ ते २०२३ दरम्यान हवेचे प्रदूषण हे एक आव्हान बनले आहे.