कैदेतील रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली करणार: हसन मुश्रीफ

By संतोष आंधळे | Published: October 22, 2023 06:40 AM2023-10-22T06:40:57+5:302023-10-22T06:41:40+5:30

तज्ज्ञांची समिती स्थापन करणार, लवकरच बैठक घेणार

to make separate regulations for patients in custody said hasan mushrif | कैदेतील रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली करणार: हसन मुश्रीफ

कैदेतील रुग्णांसाठी स्वतंत्र नियमावली करणार: हसन मुश्रीफ

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर ससून रुग्णालयातील त्याच्या दीर्घ मुक्कामाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत कैदी रुग्ण म्हणून दाखल करून घेण्यासाठी काही ठोस नियम असावेत यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला दिली. 

न्यायवैद्यक प्रकरणांतील महत्त्वाच्या आरोपींना ते आजारी असल्यास उपचारांसाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांत दाखल करण्यात येते. काही शासकीय रुग्णालयांत अशा कैद्यांवरील उपचारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कक्षांची रचना केलेली असते. मात्र, अनेक ठिकाणी कैदी रुग्णांना कशा पद्धतीने रुग्णालयात दाखल करून घ्यावे, याबाबत स्पष्ट सूचना नसतात. 

त्यासाठी कैदी रुग्णांबाबत सर्व रुग्णालयांत समान नियम असावेत, म्हणून तज्ज्ञांची समिती तयार करण्यात येत असून वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

सद्य:स्थिती काय?

- राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालये आहेत. 
- त्या ठिकणी नियमितपणे कैदी उपचारासाठी येत असतात. 
- अनेकदा कैद्यांच्या रुग्णालयातील वास्तव्यावरून वाद निर्माण होतात. 
- जे. जे. रुग्णालयात ४४ क्रमांकाचा नेत्रविभागाच्या इमारतीत कैद्यांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहे.

प्रक्रिया काय?

- आरोग्याच्या तक्रारी असलेल्या कैद्याला तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले जाते. 
- त्याची तपासणी करून कैद्याला रुग्णालयात दाखल करावे की नाही, हे वरिष्ठांना विचारून ठरवले जाते. 
- कैद्याला खरोखर रुग्णालयात दाखल करण्याची गरज असेल तर त्या रुग्णालयातील युनिट प्रमुखाला विचारून परवानगी घ्यावी लागते.


 

Web Title: to make separate regulations for patients in custody said hasan mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.