मुंबई : पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांचा मुद्दा दरवर्षी चांगलाच गाजतो. त्यामुळे हे रस्ते कायमचे खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे ठरविले आहे. परंतु, सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या दुरवस्था झालेले रस्ते तसेच त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यंदा मास्टिक अस्फाल्टचाच वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. मुंबईत सध्या खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रीट, रीअॅक्टिव अस्फाल्ट, कोल्ड मिक्स या पद्धतीचा वापर केला जात आहे. काँक्रीट आणि डांबराचे रस्ते तसेच दोन रस्त्यांमधील पॅच भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रीटच्या वापरावर भर देण्यात आला आहे. तसेच कामे करताना रस्त्याची रुंदी किती आहे, रस्ते कोणाच्या हद्दीतील आहेत, या बाबी तूर्तास मागे ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
पालिका प्रशासनातर्फे दोषदायित्व कालावधीत समावेश नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मास्टिक अस्फाल्टचा वापर केला जात आहे. खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने सात परिमंडळात मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. तर, नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यासाठी वॉर्ड स्तरावर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यासाठी रस्ते विभागाच्या अखत्यारित स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नऊ मीटरच्या खालील रस्त्यासाठी दीड कोटी रुपये आणि नऊ मीटरपेक्षा जास्त रस्त्यांसाठी अडीच कोटी खर्च केला जाणार आहे.
मास्टिक अस्फाल्ट म्हणजे काय?
मास्टिक अस्फाल्ट डांबराचाच एक प्रकार असून, हा टिकाऊ असतो. कोल्ड मिक्स हा प्रकार मोठ्या रस्त्यावर फार काळ टिकत नाही. या उलट मास्टिक अस्फाल्टने खड्डे बुजवल्यास ते लवकर उखडले जात नाहीत, खड्डेही चांगल्या प्रकारे भरले जातात.