प्रचार करायचा की ईडीची उत्तरे द्यायची? अमोल कीर्तिकर यांना ईडीचे दुसरे समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 07:35 AM2024-03-30T07:35:29+5:302024-03-30T07:36:04+5:30
ठाकरे गटातर्फे बुधवारी कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर होताच ईडीने त्याच दिवशी त्यांना समन्स जारी केले होते.
मुंबई : कोरोनाकाळात स्थलांतरितांना खिचडी वितरण करण्यावेळी झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दुसऱ्यांदा समन्स जारी करत ८ एप्रिलपूर्वी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रचार करायचा की ईडीच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची, असा संभ्रम त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
ठाकरे गटातर्फे बुधवारी कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर होताच ईडीने त्याच दिवशी त्यांना समन्स जारी केले होते. प्राप्त माहितीनुसार, कोरोनाकाळात झालेल्या या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर, २०२३ मध्ये गुन्हा नोंदवला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर, बाळा कदम, राजीव साळुंखे तसेच मुंबई महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशीही करण्यात आली होती.
या प्रकरणी एकूण ६ कोटी ३७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
त्याच दरम्यान अमोल कीर्तिकर यांचीही पोलिसांनी सहा तास चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या तक्रारीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे.