Join us

रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटना टाळाव्यात म्हणून...; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

By संतोष आंधळे | Published: March 25, 2024 7:57 PM

राज्य अग्निसुरक्षा नियमांनुसार स्थानिक अग्निशमन विभागाकडून दरवर्षी अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे.

मुंबई : वातावरणातील उष्मा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजन टाक्या अथवा ऑक्सिजन पाईप असलेल्या भागाची सुरक्षा, स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्मची स्थापना आणि नियमित इलेक्ट्रिकल लोड ऑडिट करून घेण्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यांचा आरोग्य विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त रुग्णालये अग्निसुरक्षेशी संबंधित सर्व गोष्टी  सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या निकट संपर्कात राहून त्यांनी काम करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. सर्व रुग्णालयात अग्निसुरक्षा ऑडिट / ऑन-साइट (प्रत्यक्ष) तपासणी करणे. फायर अलार्म, फायर स्मोक डिटेक्टर, अग्निशामक यंत्रे, फायर हायड्रंट्स आणि फायर लिफ्ट्ससह अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध आहे, आणि ती पूर्णपणे कार्यरत आहे, याची खात्री करून घेणे गरजेचे असल्याचेच म्हटले आहे,

काही महत्त्वाच्या सूचना

ऑक्सिजन टाक्या अथवा ऑक्सिजन पाईप असलेल्या भागात, धूम्रपान प्रतिबंधक धोरणांची कठोर अंमलबजावणी करणे आणि उष्णतेच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवणे. या भागांना स्पष्टपणे चिन्हांकित करावे.  संपूर्ण रुग्णालयात, विशेषत: रुग्णांच्या खोल्या, मधली जागा आणि सार्वजनिक भागात फायर स्मोक डिटेक्टर आणि फायर अलार्म बसविले आहेत याची खात्री करणे. आयसीयु आणि शस्त्रक्रिया विभागासह अती महत्वाच्या विभागांमध्ये सहज उपलब्ध होईल अशी स्वयंचलित पाणी फवारणी प्रणाली आणि होझ पाईप बसवणे. ही प्रणाली फायर अलार्म प्रणालीशी जोडली जावी, जी आगीच्या वेळी कार्यान्वित होईल.

अग्निसुरक्षा एनओसी मिळवणे

राज्य अग्निसुरक्षा नियमांनुसार स्थानिक अग्निशमन विभागाकडून दरवर्षी अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून घेणे. यामध्ये अद्ययावत अग्निसुरक्षा योजना आणि उपकरणांची देखभाल आणि कर्मचारी प्रशिक्षणाच्या नोंदी सादर करणे गरजेचे आहे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी अग्निशामक उपकरणांचा वापर याविषयी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे. तसेच कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत कशा पद्धतीने  प्रतिसाद द्यायचा हे शिकविणे. दोन वर्षातून एकदा फायर ड्रिल आयोजित करणे.

टॅग्स :हॉस्पिटल