संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा सावरली; महिला साहाय्य कक्षाची मोलाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 11:54 AM2024-06-14T11:54:04+5:302024-06-14T12:00:48+5:30
महिला साहाय्य कक्षाने आतापर्यंत अनेकांमध्ये समेट घडवून संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा सावरली आहे.
मुंबई : पती-पत्नीमधील वाद तसेच महिलांचा होणारा छळ, अत्याचार आदी प्रकरणांमध्ये मुंबई पोलिस दलाचा महिला अत्याचारविरोधी कक्ष आणि महिला साहाय्य कक्ष मोलाची भूमिका बजावत आहे. या कक्षाने आतापर्यंत अनेकांमध्ये समेट घडवून संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा सावरली आहे.
पीडित महिलांना न्याय देण्यासाठी पोलिसांचे महिला अत्याचारविरोधी कक्ष, महिला साहाय्य कक्ष कार्यरत आहेत. पोलिस उपायुक्त (अंमलबजावणी) यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज सुरू आहे. आतापर्यंत शेकडो संसार वाचविण्यास पोलिसांना यश आले. महिलांनाही हे कक्ष आधार ठरत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची पतीविरोधात लेखी तक्रार येताच, आधी तिची बाजू, परिस्थिती समजून घेतली जाते.
१) पुढे, आम्ही पती-पत्नीची बाजू ऐकून, समजून घेतो. दोघांना विश्वासात घेऊन त्यांना कुटुंब जबाबदारी, मुले, सामाजिक भान याबाबत माहिती देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येते.
२) महिलेची चौकशी करून सगळे योग्य सुरू आहे का नाही, याची विचारपूस केली जाते.
३) समुपदेशन करूनही दोघांनाही एकत्र राहायचे नसल्यास अशावेळी पुढील कारवाईसाठी ती प्रकरणे संबंधितांकडे पाठविली जातात.
४) दुसरीकडे गंभीर प्रकरणांत खातरजमा करत तत्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात येते.
...म्हणून थेट न्यायालयात
अनेक घटनांमध्ये पती अथवा पत्नी पोलिसांचेही म्हणणे ऐकून घेत नाहीत. अशावेळी ही प्रकरणे थेट न्यायालयात जातात. प्रलंबित अर्जावर दोन्ही बाजूचे म्हणणे महिला कक्षाकडे प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना बोलवले जाते. नेमके वादाचे कारण शोधून त्यावर तोडगा काढण्यास कक्षातील कर्मचारी महत्त्व देतात.
ही आहेत कारणे...
आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रासासोबतच विवाहबाह्य अनैतिक संबंध, एकत्र कुटुंब पद्धत, सासरच्या मंडळीकडून छळ, हुंड्याची मागणी ही प्रमुख कारणे दिसून येत आहेत. कोरोनाच्या काळात क्षुल्लक वादही घटस्फोटापर्यंत पोहोचले होते.
सात महिन्यांत शेकडो अर्ज-
स्वतंत्र महिला कक्ष कार्यान्वित असून, तेथे आलेल्या तक्रारीवर लगेच कारवाई न होता कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. गेल्या सात महिन्यांत शेकडो तक्रारी आल्या आहेत.
पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न-
कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.