धूळ थाेपवण्यासाठी...! मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी केली जातेय पाण्याची फवारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:57 PM2023-11-03T12:57:36+5:302023-11-03T12:57:57+5:30
कोणकोणत्या प्रकल्पस्थळी धूळ उडू नये म्हणून केली उपाययोजना, जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकीकडे दूषित हवा आणि प्रदूषणाने मुंबईकर बेजार झाले असतानाच यातून काही अंशी दिलासा मिळावा, यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. मुंबईत मेट्रोच्या विविध प्रकल्पांची कामे सुरू असून, बांधकामाच्या ठिकाणी धूळ उडू नये, यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याची फवारणी केली जात आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्याकरिता तसेच पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएकडून शहरात मेट्रोची उभारणी केली जात आहे. मेट्रोची कामे जोरदार सुरू असून, मुंबईत या कामामुळे प्रदूषणात भर पडू नये, यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना एमएमआरडीएकडून केल्या जात आहेत. त्यानुसार प्रकल्पस्थळी धूळ उडू नये, यासाठी पाण्याची फवारणी करणे, उत्खनन केलेली मातीची वाहतूक करताना ती झाकणे, रस्त्यावरील माती वारंवार साफ करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत.
येथे करण्यात आल्या उपाययोजना
- मेट्रो ९चे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी धूळ उडू नये, यासाठी पाण्याची नियमित फवारणी केली जात आहे.
- मालाड मालवणी कास्टिंग यार्ड, प्लेसेंट पार्क, मीरा रोड आरएमसी प्लांट आणि घोडबंदर रोड ठाणे कास्टिंग यार्ड या ठिकाणी पाण्याची फवारणी केली जात आहे. रस्त्यावर साचणारी धूळ नियमित साफ केली जात आहे.
- बांधकामाच्या ठिकाणी ग्रीन नेट लावण्यात आले आहेत, जेणेकरून धूळ उडू नये. माती, वाळू साठवणूक करण्यात येणाऱ्या ठिकाणी नेट लावण्यात आले आहे.
- त्यामुळे हवेत धूळ उडून प्रदूषण टाळण्यास मदत होत असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.