लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या दहा वर्षांत उत्तर पूर्व मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी घरे आणि धारावी पुनर्वसनाबाबत काही जण दिशाभूल करत आहेत. आम्ही मात्र त्याबाबत वस्तुस्थिती लोकांपुढे घेऊन जात आहोत, असे या मतदारसंघासाठी भाजपने घोषित केलेले उमेदवार मिहीर कोटेचा यांनी सांगितले. भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळीसह आजूबाजूच्या परिसरात सुमारे एक लाख कोकणी बांधवांसाठी मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस बांधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते.
मतदार हुशार आहेत. कोरोनाच्या काळात भांडुप, विक्रोळीतील नागरिकांना मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरचा आधार होता. आम्ही अहोरात्र त्यांच्यासाठी उपलब्ध होतो. त्या काळात भांडुपचे आमदार बाराही महिने गावातच होते. त्यामुळे मुलुंडचा आमदार असताना केलेल्या कामांमुळे मतदारसंघात ओळख आहे. २०१९ पासून २०२२ पर्यंत सत्तापरिवर्तनादरम्यान पक्षाने माझे कोविड काळातील काम बघितले. मी वेळोवेळी विविध भ्रष्टाचार उघडकीस आणले. त्याच विश्वासावर आपला लढवय्या सैनिक म्हणून मला उतरवले. आम्ही पूर्ण ताकदीने या लढाईत उतरलो आहोत. मतांचे समीरकरण भरून काढण्यासाठी मोदींचे लाभार्थी सक्षम आहेत. त्यांना सणोत्सवाला मोफत किराणा तसेच सुरक्षा कवच मिळत आहे. नागरिक त्याचा फायदा घेत आहेत. विधवा पेन्शनअंतर्गत दीड हजार रुपये येतात. गरीब मुंबईकरांच्या पाठीशी मोदीजी नेहमीच आहेत. देशात विकास झाला तसाच मुंबईत झाला. याच विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहोत.
डम्पिंग ग्राऊंड मुलुंडमधून कांजूरला हलवले. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. सेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यामुळेच कांजूरला डम्पिंग ग्राऊंड हलवले गेले. त्याची क्षमता संपल्यानंतर मुदतवाढ मिळू देणार नाही. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून मुलुंडमध्ये पीएपी प्रकल्प आणि धारावी पुनर्वसनाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी असेपर्यंत धारावीकर मुलुंडमध्ये येऊ देणार नाही. पीएपीलादेखील उद्धव ठाकरे यांच्या काळात मान्यता दिली. आम्ही वेळोवेळी याबाबत आवाज उठवत पाठपुरावा करत आहोत.
कोटेचा म्हणाले की, मुलुंड येथे टर्मिनस उभारल्यास जवळपास एक लाख कोकणी बांधवांना त्याचा लाभ होईल. भांडुप, विक्रोळीत नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येतील. तसेच, आरोग्य व्यवस्थेबाबत काम सुरू आहे. निवडणूक आव्हानात्मक असली तरी मोदींचे विकासकाम, शिंदे गट, अजित पवार गट यांच्या सोबतीबरोबर मनसेच्या साथीने प्रयत्न सुरू आहेत. मतदारांचा मोदींवर विश्वास आहे. तो विश्वास आम्हाला लढण्यासाठी बळ देतो.