मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्प सुरू करायचेत, महारेराच्या नोंदणीसाठी पूर्ण माहितीसह अर्ज करा
By सचिन लुंगसे | Published: October 10, 2023 11:27 AM2023-10-10T11:27:16+5:302023-10-10T11:28:17+5:30
Mumbai News: नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा, सुरूवात करता यावी यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा, असे आवाहन महारेराने विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केले आहे.
मुंबई - नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा, सुरूवात करता यावी यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा, असे आवाहन महारेराने विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केले आहे. सर्व विकासक आणि प्रवर्तकांसाठी हे पत्र महारेराच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आले आहे.
नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहुर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा करीत असतात. सुरूवात करीत असतात. अर्थात यासाठी त्यांना महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, नोंदणी, विक्री करता येत नाही. म्हणून नोंदणीक्रमांक लवकरात लवकर मिळावा असा ते आग्रह धरतात.
नोंदणीक्रमांक देण्याची महारेराची सुनिश्चित कार्यपद्धती आहे. विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांच्यामुळे ती सर्वांना माहितही आहे. यात महारेरा ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रस्तावाची आर्थिक, कायदेविषयक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करते.
या विकासकांना लवकरात लवकर नोंदणीक्रमांक मिळावेत यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. परंतु अपेक्षित कागदपत्रे सादर न केल्यास, त्रुटींची पूर्तता न झाल्यास यात अडचणी येऊ शकतात. याची जाणीव ठेवून विकासकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महारेराने केले आहे.