कर्करोग विभागातील डॉक्टरलाच तंबाखू अन् गुटख्याचं व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 08:05 AM2018-08-27T08:05:50+5:302018-08-27T08:06:39+5:30
रुग्णाचा आरोप : आॅनड्युटी असताना केले मद्यसेवन; रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार
मुंबई : तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू आणि गुटख्याचे सेवन आहे. शासकीय आणि सामाजिक संस्था विविध स्तरांतून याविषयी सातत्याने जनजागृती करत असतात. मात्र, कामा रुग्णालयाच्या कर्करोग विभागातील एका वरिष्ठ डॉक्टरनेच मंगळवारी ड्युटीवर असताना गुटखा खाल्ल्याचा आरोप एका रुग्णाने केला आहे, तसेच या वेळी त्याने मद्यपान केल्याचेही त्या रुग्णाने म्हटले आहे. याविषयी रुग्णाने रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता, ही खोटी तक्रार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
कामा रुग्णालयाच्या सेवानिवृत्त परिचारिका इंदुमती शिरसाट यांच्यावर कामा रुग्णालयातील रेडिएशन विभागात कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. त्याकरिता २० आॅगस्ट रोजी वैद्यकीय बिलावर सही घेण्यासाठी त्या डॉ. महेश रेवाडकर यांच्याकडे गेल्या. प्रत्येक वेळी या वैद्यकीय बिलावर स्वाक्षरी करण्याचे काम विनाअडथळा पार पडते. मात्र, त्या वेळी डॉ. रेवाडकर यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. हे संभाषण सुरू असताना डॉ. रेवाडकर यांनी गुटखा खाल्ल्याचे व मद्यपान केल्याचे आढळले, अशी माहिती इंदुमती शिरसाट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या घडलेल्या प्रकाराची लेखी तक्रार शिरसाट यांनी कामा रुग्णालय प्रशासन, जे. जे. समूह रुग्णालय अधिष्ठाता, राज्य शासनाचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वाक्षरी केली नाही, म्हणून खोटी तक्रार
या प्रकरणाविषयी लेखी तक्रार रुग्णालय प्रशासनाला मिळाली आहे. याविषयी डॉ. रेवाडकर यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तक्रारदार शिरसाट यांच्या वैद्यकीय बिलावर स्वाक्षरी केली नसल्याने त्यांनी खोटी तक्रार केली आहे.
- डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षिका, कामा रुग्णालय.