शाळांमध्ये तंबाखूविरोधी अभियान
By admin | Published: April 12, 2015 02:06 AM2015-04-12T02:06:51+5:302015-04-12T02:06:51+5:30
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात.
मुंबई : तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. लहान वयातच मुलांनी तंबाखू खाण्यास सुरुवात केल्यास तरुणपणात कर्करोगाच्या विळख्यात अडकतात. ‘तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक’ हा संदेश लहान वयातच मुलांना मिळाल्यास तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होईल. यासाठीच देशातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान सुरू करणार असल्याची माहिती मुंबईतील टाटा रुग्णालयात बोलताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली.
ते म्हणाले, की वैद्यकीय क्षेत्रात अनेक समस्या आहेत, नवीन घडामोडी, संशोधने होत असतात. पण याची माहिती निर्णयकर्त्याला मिळतच नाही. कारण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ निर्णयकर्त्यांशी संवाद साधत नाहीत. संवाद वाढल्यास निर्णयकर्त्यांचे ज्ञान वाढेल आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतील. संसर्गजन्य आजारांवर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आखून यश संपादन केले आहे. सध्या असंसर्गजन्य आजारांचे आव्हान समोर आहे.
या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, की तंबाखूमुळे कर्करोग होतो हे सत्य आहे़ ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाले आहे. तंबाखूमुळे कर्करोग होत नाही, असे म्हणणाऱ्यांशी आम्ही सहमत नाही. लवकर निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. सुशिक्षित व्यक्तीला कर्करोगाची सात लक्षणे विचारल्यास सांगता येत नाहीत. दोन किंवा तीन लक्षणे माहीत आहेत. कर्करोगाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. शहर सोडून डॉक्टरांनी गावाकडे जाऊन रुग्णांची तपासणी केली पाहिजे.
टाटा रुग्णालयात पहिल्यांदाच टाटा स्मारक केंद्रामधून कर्करोग आणि संबंधित अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
जनजागृती आवश्यक
कॅन्सरसारखे आजार रोखण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळेस बोलताना व्यक्त
केल. (प्रतिनिधी)
च्टाटा स्मारक केंद्रात सरकारी रुग्णालयातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागा आहेत. देशात ५८ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, पण तेथून डॉक्टर केंद्रात शिक्षण घ्यायला येत नाहीत. डॉक्टर आल्यास अनेक रुग्णांना याचा फायदा होईल. राष्ट्रीय कर्करोग ग्रिड संकल्पनेअंतर्गत विविध भागांमध्ये कर्करोग उपचारांचे जाळे तयार करण्यात येणार आहे, असे नड्डा यांनी सांगितले.
च्या कार्यक्रमाला जे. पी. नड्डा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या पदवीदान समारंभाला राज्याचे आरोग्यमंत्री तावडे, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. के. सिन्हा, अणुऊर्जा आयोगाचे सदस्य डॉ. आर. बी. ग्रोव्हर, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. बडवे आणि डॉ. के. एस. शर्मा उपस्थित होते. २०१३ आणि २०१४ या शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झालेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.