समुपदेशनातून सुटू शकतो तंबाखू
By Admin | Published: January 31, 2016 03:00 AM2016-01-31T03:00:00+5:302016-01-31T03:00:00+5:30
कोणत्याही वयात जडणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अनेकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अथवा व्यसन सोडण्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही.
मुंबई : कोणत्याही वयात जडणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी अनेकांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही अथवा व्यसन सोडण्यासाठी लागणारा खर्च परवडत नाही. त्यामुळेच सामान्यांना सहज उपलब्ध होईल असे व्यसनमुक्तीचे नवे अभियान सलाम बॉम्बे या संस्थेने हाती घेतले आहे. यामुळे केवळ समुपदेशनाद्वारे ‘तंबाखू’पासून सुटका मिळणे शक्य होणार आहे.
सलाम बॉम्बे संस्थेने ‘लाइफ फर्स्ट टोबॅको ट्रीटमेंट’ची सुरुवात केली आहे. तंबाखूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करून तंबाखू सेवनापासून त्यांना रोखले जाऊ शकते. ही उपचारपद्धती विविध वयोगटांसाठी उपलब्ध आहे. यात तंबाखूचे व्यसन असणाऱ्या व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्तीही तितकीच आवश्यक आहे, कारण नुसत्या समुपदेशनाने चालणाऱ्या उपचार पद्धतीत विविध टप्पे पार पडत तंबाखूची सवय सोडण्यास मदत होऊ शकते. यासाठी साधारण सहा महिन्यांचा काळ लागू शकतो.
सध्या ही उपचारपद्धती समाजातील विविध घटक रचनांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलात आणण्यात येत आहे. या उपचार पद्धतीचा अवलंब शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि खासगी कार्यालय अशा काही ठिकाणी करण्यात आला आहे. त्यानुसार, करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४५ ते ७५ टक्के लोकांनी सरकारी आरोग्य सुविधांमध्ये उपचार घेऊन तंबाखूचे सेवन पूर्णत: बंद केले आहे तर शाळा आणि कार्यालयांच्या ठिकाणीही तंबाखू सेवनाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.
तंबाखू सेवनात महिलाही अग्रक्रमावर
तंबाखू सेवनात पुरुषांबरोबर महिलासुद्धा अग्रक्रमावर आहेत. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला तंबाखू असलेल्या पदार्थाचे सेवन करतात. यात मुख्यत्वे सिगारेट, मशेरी यांचा समावेश असतो.
या उपचार पद्धतीचा अवलंब शाळा, महाविद्यालये, शासकीय आणि खासगी कार्यालय अशा काही ठिकाणी करण्यात आला आहे. त्यानुसार, करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४५ ते ७५ टक्के लोकांनी
सरकारी आरोग्य सुविधांमध्ये उपचार घेऊन तंबाखूचे सेवन पूर्णत: बंद केले आहे.
समुपदेशनानंतर ‘तंबाखू’ सोडलेल्यांचे प्रमाण
रुग्णालय- ७६%
शाळा- ८२%
कार्यालय- ६२%
क्षयरोग पीडित- ७५%
सरकारी अभियानादरम्यान- ४५%