मुंबई : ओशिवरा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बीबी हाऊस बॉईज अँड गर्ल्स हॉस्टेलमध्ये हुक्का पार्लर चालविले जात असल्याची धक्कादायक बाब रविवारी उघडकीस आली. गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी कक्षाने या प्रकरणी कारवाई करत पार्लरचा चालक, व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोखंडवाला परिसरात असलेल्या तिसरी क्रॉस लेनमध्ये हे हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये तंबाखूयुक्त हुक्का पुरविला जात असल्याची माहिती अंमलबजावणी कक्षाच्या पोलिस निरीक्षक अनिता कदम यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कदम, पोलिस उपनिरीक्षक योगेश कान्हेरकर, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब कानवडे आणि पथकाने या हॉस्टेलमध्ये धाड टाकली. सुरुवातीला त्यांनी चालक-कम- कॅशियर हार्दिक पाराशर (३०) आणि व्यवस्थापक मोनीश सय्यद (३०) यांना ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हुक्का पार्लरमध्ये हुक्क्याचे साहित्य, तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवरचे अर्धवट ठेवलेले डबे, जमिनीवर शेगडी आणि त्यावर कोळसा पेटत असल्याचे दिसले.
पोलिसांनी पाराशर याच्याकडे चौकशी केल्यावर ही जागा ही विकास खोकीर यांच्या मालकीची असून, पहिला मजल्यावर हॉल हा हॉस्टेलकरिता दिला असून, उर्वरित जागा हुक्का पार्लरकरिता भाड्याने दिल्याचे त्यांनी सांगितले.
धगधगते निखारेअन् हुक्कापात्र बऱ्याच ठिकाणी झायामधून धगधगते निखारे आणून ते हुक्कापात्रात टाकले जात होते. ज्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत असल्याने संबंधित ठिकाणी असलेले सोफासेट आणि लाकडी फर्निचर यांना आग लागण्याची दाट शक्यता होती. पोलिसांनी या ठिकाणच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. दरम्यान, एका महिलेसह आठ पुरुष ग्राहकांचेही जबाब नोंदविले गेलेत. ज्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
म्हणून झाली कारवाई- हुक्का पार्लर हे विनापरवाना सुरु होते.- कुठेही स्मोकिंग झोन बोर्ड लावलेला नव्हता. हुक्क्यातील धूर बाहेर जाण्याकरिता उपाययोजना नव्हती. धोकादायकरित्या पेटता कोळसा झायामध्ये घेऊन फिरविण्यात येत असल्याने आग लागण्याची भीती होती.