Join us

कुर्ला-सायन मार्गावर आज ६ तासांचा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 2:00 AM

कुर्ला ते शीव स्थानकांदरम्यान धोकादायक असलेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन सहा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटे ते रविवारी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत पूल पाडकाम सुरू राहणार आहे. या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील १० एक्स्प्रेस रद्द करण्यात येतील.

ठळक मुद्देपादचारी पूल होणार जमीनदोस्त : वडाळा-मानखुर्द हार्बर मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुर्ला ते शीव स्थानकांदरम्यान धोकादायक असलेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन सहा तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटे ते रविवारी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत पूल पाडकाम सुरू राहणार आहे. या कामामुळे मुंबई-पुणे, मुंबई-मनमाड मार्गावरील १० एक्स्प्रेस रद्द करण्यात येतील. तसेच उपनगरीय लोकलसह मेल-एक्स्प्रेसदेखील विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरही विशेष ब्लॉक घोषित केला आहे. परिणामी अप आणि डाऊन मार्ग वडाळा-मानखुर्द स्थानकांदरम्यान पूर्ण बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल, बेलापूर व वाशीकरिता सुटणाऱ्या लोकल शनिवारी रात्री १०.५८ ते मध्यरात्री १२.४० आणि रविवारी पहाटे ४.३२ मिनिटे ते ५.५६ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहेत.

पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकडे येणाºया लोकल शनिवारी रात्री ९.५९ ते १२.०३ व ३.५१ ते ५.१५ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहेत. ब्लॉक काळात पनवेल-मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करण्याची मुभा मध्य रेल्वेने ब्लॉक काळात दिली आहे.

पश्चिम रेल्वेवरील वसई रोड ते भार्इंदर या स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री ००.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत अप व डाउन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे.

 

१७ एक्स्प्रेस १ ते २ तास उशिराने

ब्लॉक काळात १७ एक्स्प्रेस तब्बल १ ते २ तास विलंबाने धावणार आहेत. यात महालक्ष्मी एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस, हुसैनसागर एक्स्प्रेस, चालुक्य एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस आणि पंजाब मेलसह एकूण १७ एक्स्प्रेसचा समावेश आहे.

 

रविवारी १० एक्स्प्रेस रद्द

पुलाच्या कामामुळे सर्वाधिक फटका मेल-एक्स्प्रेसला बसणार आहे. पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :हार्बर रेल्वेकुर्ला