आज आणि उद्या ‘विकेंड’ धडाका
By admin | Published: February 18, 2017 07:04 AM2017-02-18T07:04:57+5:302017-02-18T07:04:57+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भाषणांची जुगलबंदी सुरू असतानाच ठिकठिकाणी रंगलेल्या
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भाषणांची जुगलबंदी सुरू असतानाच ठिकठिकाणी रंगलेल्या प्रचार फेऱ्यांनी कुरघोडी आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच्या शेवटच्या शनिवारसह रविवार गाजविण्यास सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे.
शनिवार आणि रविवार हे रजेचे दिवस असल्याने मतदारांना गाठून त्यांचे मत आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. एका प्रभागात डझनभर उमेदवार असले तरी बऱ्याच ठिकाणची लढत ही चौरंगी आहे. परिणामी, शनिवारसह रविवारच्या भेटीगाठींचे नियोजन झाले असून, झोपड्या, बैठ्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना भेटण्यावर उमेदवारांचा जोर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वच राजकीय पक्षांकडून गृहिणी महिलांचे छोटछोटे गट तयार करण्यात आले असून, हे गट ठिकठिकाणी संबंधित उमेदवाराचा प्रचार-प्रसार करीत आहेत. दरम्यान, या दोन दिवशी अधिकाधिक कार्यकर्ते आपल्या प्रचार फेरीत सहभागी व्हावेत यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे. परिणामी, कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले असले तरी कार्यकर्ते नेमके कोणाच्या प्रचारात सहभागी होतात? हे मात्र संबंधित उमेदवाराची ‘ताकद’च ठरवत आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन दिवस साधत राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेचे नेतेच प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार ‘हिट’ ठरणार असून, कोण ‘आघाडी’ मारणार? हे मात्र यानंतरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)