पालघर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे विविध तसेच महत्त्वपूर्ण प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने उद्या (बुधवार) १ जुलै रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.शिक्षकांच्या कामात सुव्यवस्थितपणा, सुव्यवस्थापन, पारदर्शीपणा आणणे, नियमीत वेतन, विविध शिष्यवृत्ती योजनेत आॅनलाईन कामामध्ये शिक्षकांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड दूर करणे निवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्ती वेतन आदेश देणे, संच मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी, माध्यान भोजनाच्या कार्यक्रमातून मुख्याध्यापक व शिक्षकांची तत्काळ मुक्तता, कमी अधिक शिक्षकांचे समायोजन ३० सप्टेंबर २०१५ च्या विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन करणे, शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून घेणे, तूर्त अध्यापन बदल्या रद्द करून समायोजन विनंती तसेच जिल्हांतर्गंत बदल्यात पारदर्शकता आणणे, असे अनेक प्रश्न राज्यशासन पातळीवर प्रलंबित आहेत. अशा विविध न्याय मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याकरीता शिक्षक संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. उद्या शिक्षक सेना संघटनेचे प्रांताध्यक्ष ज.मा. अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, चिटणीस अविनाश सोनावणे, कोषाध्यक्ष जितेंद्र वडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
आज शिक्षक सेनेचे धरणे
By admin | Published: June 30, 2015 10:49 PM