आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस !, राज ठाकरेंनी दिल्या लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:39 AM2017-09-28T07:39:28+5:302017-09-28T14:33:00+5:30
भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. ज्यांच्या आवाजाने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.
मुंबई - भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. ज्यांच्या आवाजाने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. अशा भारतरत्न लता मंगेशकर या आपल्या देशातील सर्वात अनमोल गायिका आहेत. अमेरिकेतील काही शास्त्रज्ञ तर म्हणतात की एव्हढ्या सुरमयी आणि मंजुळ आवाजाची गायिका याआधी कधी झाली नाही आणि होणारही नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी खास लतादीदींसाठी शुभेच्छाचित्र काढले आहे, सोबत ''आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!'' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लता मंगेशकरांना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूरच्या पंडित दीनदयाळ मंगेशकर या परिवारात झाला. दीदींचे वडील, दीनानाथ मंगेशकर हे एक रंगमंच कलाकार आणि गायक होते. त्यामुळे संगीत हे दीदींना विरासतीतच मिळाले होते. खूप कमी लोकांना माहीत असेल की दीदींचं आगोदर नाव हेमा होतं, परंतु जन्मांनंतर ५ वर्षांनी दीदींचं नाव लता ठेवले. लतादीदी सर्व भावंडांमध्ये मोठ्या आहेत. आशा, उषा, मीना आणी हृदयनाथ ही लहान भावंडं.
लतादीदींनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या मराठी संगीत नाटकांत काम करावयास सुरवात केली होती. १९४२मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी दीदी केवळ १३ वर्षांच्या होत्या. नवयुग चित्रपट कंपनी मालक आणि दीदींच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी मंगेशकर कुटुंबाची मदत केली आणि दीदींना एक गायक आणि अभिनेत्री होण्यास हातभार लावला.
लतादीदींची संगीत सफर मराठी चित्रपटांपासून झाली. किती हसाल (१९४२) या मराठी चित्रपटात दीदींनी नाचुं या गडे, खेळू सारी, मनी हौस भारी हे गाणं गायले होते, परंतु दुर्दैवाने हे गाणे चित्रपटातून गाळण्यात आले होते. त्यानंतर पहिली मंगळागौर (१९४२) या चित्रपटामध्ये त्यांनी छोटी भूमिका केली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे गीत देखील गायले.
दीदींनी माता एक सपूत की 'दुनिया बदल दे तू हे हिंदी भाषेतील पहिले गाणे गजाभाऊ (१९४३) या मराठी चित्रपटासाठी गायले. १९४५ साली मंगेशकर कुटुंब महाराष्ट्रात राहावयास आले.
उस्ताद अमानत अली खाँ ह्यांच्याकडून दीदी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ देवासवालेंकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही दीदींना तालीम मिळाली. त्यांनी मास्टर विनायक यांच्या हिंदी चित्रपटांमध्ये छोटे रोल करता करता हिंदी गाणी आणि भजने गायली.
त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) या हिन्दी चित्रपटामध्ये दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले पा लागूं कर जोरी हे गाणे गायले. १९४८ साली मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केले. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची संधी दिली. १९४९ साली महल चित्रपटामधील आयेगा आनेवाला हे गाणे दीदींच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले. १९५० मध्ये दीदींनी अनिल बिश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद अली, एसडी बर्मन, मदन-मोहन अशा कैक सुप्रसिद्ध संगीतकारांबरोबर काम केले. १९५५ मध्ये तमिळ चित्रपटांसाठी गाणी गायली.
लतादीदींना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम फिल्मफेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळाले. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रीत गाणे तुफान लोकप्रिय झाले. अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन संगीत-दिग्दर्शित दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रीत गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. बीस साल बाद (१९६२) या चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी त्यांना दुसरे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
लतादीदींनी नौशाद साहेबांकरिता विविध रागांवर आधारित गाणीही गायली आहेत. त्यामध्ये बैजू बावरा (१९५२), मुगल-ए-आजम (१९६०), कोहिनूर (१९६०) सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी शंकर-जयकिशन बरोबर आग, आह (१९५३), श्री ४२० (१९५५), चोरी-चोरी (१९५६) या चित्रपटांतील गाणी गायली. त्या सचिनदेव बर्मन यांच्या आवडत्या गायिका होत्या. त्यांनी साज़ा (१९५१), हाउस नं. ४२० (१९५५) आणि देवदास (१९५५) या चित्रपटांसाठी गाणी स्वरबद्ध केली होती. यानंतर मात्र बर्मनदा आणि दीदींमध्ये काही वाद झाले ज्यामुळे त्यांनी काही काळ बर्मनदाकरिता गाणी गायली नाहीत.
१९६१ साली दीदींनी लोकप्रिय भजन 'अल्लाह तेरो नाम'आणि 'प्रभु तेरो नाम' अशी भजने गायली तर १९६३ मध्ये 'ऐ मेरे वतन के लोगों' हे देशभक्तपर अमर गीत गाऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. दीदींनी मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.
लतादीदींनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतिन-ललित, दिलीप-समीर सेन, उत्तम सिंह, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव तथा ए आर रहमान यांच्याबरोबरही काम केले आहे आणि जगजीत सिंह, एस पी बालसुब्रमण्यम, उदित नारायण, हरिहरन, कुमार शानू, सुरेश वाडकर, मो. अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूपकुमार राठौड़, विनोद राठौड़, गुरदास मान तथा सोनू निगम यांच्याबरोबर युगलगीतेंही गायली आहेत.
या गानकोकिळेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday wishes to respected @mangeshkarlata Didi. Her melodious voice is admired by crores of Indians. I pray for her long & healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2017
A very Happy Birthday to the Goddess of Music and our beloved Didi #LataMangeshkar Wish you a long and healthy life. @mangeshkarlata 🙏🙏 pic.twitter.com/UYvtAHZyak
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) September 28, 2017
Happy 88th Birthday To Nightingale Of India, Lata Mangeshkar. Wish You A Very Happy And Healthy Life. #LataMangeshkar 🙏🏾🇮🇳 pic.twitter.com/BJYEY5YqLc
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) September 28, 2017