Join us  

मध्य रेल्वेचा आज मेगा- पॉवरब्लॉक

By admin | Published: May 08, 2016 2:57 AM

मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रविवार, ८ मे रोजी कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक तसेच कल्याण रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्यासाठी शहाड

डोंबिवली : मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रविवार, ८ मे रोजी कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर मेगाब्लॉक तसेच कल्याण रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्यासाठी शहाड-आंबिवली मार्गावर पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्ददरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर २४ मीटर लांबीचा मोठा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शहाड-आंबिवली स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान पॉवरब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण स्थानकातील फलाट १ए, १, २, ३ आणि ४ येथून कोणत्याही गाड्या सुटणार नाहीत. सर्व कल्याण लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पॉवरब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा, कसारा, आसनगाव लोकलही रद्द करण्यात आल्या आहेत. बदलापूर, कर्जत आणि अंबरनाथ लोकल आणि मेल-एक्स्प्रेस कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ५, ६, ७ येथून सुटणार आहेत. हार्बर मार्गावर ब्लॉकनेरूळ-मानखुर्ददरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० दरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसटीसाठी तसेच सीएसटी ते पनवेल/बेलापूर /वाशीदरम्यानची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-मानखुर्द-सीएसटी मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तसेच हार्बरच्या प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ट्रान्स-हार्र्बरसह मुख्य मार्गावरून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.या गाड्यांच्या वेळेत बदल त्याचबरोबर गोदान एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, गोरखपूर स्पेशल या गाड्यांच्या नियोजित वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. तसेच ब्लॉकच्या वेळेत येणाऱ्या बहुतांशी लांबपल्ल्यांच्या गाड्या कसारा स्थानकात थांबवण्यात येतील. त्या सीएसटीला अथवा एलटीटीला २५ मिनिटे ते २ तासांहून अधिक वेळ विलंबाने पोहोचतील, असेही मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.दादर-रत्नागिरी दिव्यातून मेगाब्लॉकमुळे ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल. त्यामुळे ५०१०३ दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून रत्नागिरीसाठी रवाना होईल.जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात अप जलद गाड्या कल्याण-ठाणेदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच त्या सर्व स्थानकांवर थांबतील. या गाड्या २० मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द पॉवरब्लॉकमुळे पंचवटी एक्स्प्रेस (अप-डाऊन), गोदावरी एक्स्प्रेस (अप-डाऊन) या लांबपल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिक, मनमाडला जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.