Join us

आज मतमोजणी, दिग्गजांचा होणार फैसला

By admin | Published: January 29, 2015 11:03 PM

नवा जिल्हा स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी दुपारी १२ ते १ पर्यंत जाहीर होणार आहेत

पालघर : नवा जिल्हा स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी दुपारी १२ ते १ पर्यंत जाहीर होणार आहेत. बहिष्कार टाकणार अशी हूल सर्वच पक्षांनी दिली होती. परंतु, आपले उमेदवार रिंगणात कायम ठेऊन शिवसेनेने या बहिष्कारातील हवाच काढून घेतली. त्यामुळे या निवडणुका अत्यंत चुरशीचा झाल्या. या निवडणुकीत झालेल्या ६२ टक्के मतदानाची मोजणी डहाणू येथे सेंट मेरीज हायस्कूल मसोली, तलासरीत ग्यान माता आदिवासी विद्यामंदिर येथे, विक्रमगड येथे पंचायत समिती सभागृहात, जव्हार येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर मोखाडा येथील तालुका खरेदी-विक्री केंद्रात केली जाणार आहे. एकाच वेळी एक गट आणि दोन गण अशी मोजणी होणार असून जिपच्या ५७ गटात १४५ तर ६ पंचायत समितींच्या ११४ गणात ४८० असे एकूण ५२५ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असून जिल्हा पोलीस प्रमुखांच्या नेतृत्वाखाली ६ पोलीस उपाधिक्षक, १८० पोलीस निरीक्षक , पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि २१४५ पोलीस तैनात केले गेले आहेत. या शिवाय राज्य राखीव पोलीस आणि राखीव पोलीस यांच्या प्रत्येकी दोन कंपन्या देखील नियुक्त करण्यात आल्या आहेत. निकाल्या वेळी अथवा त्यानंतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांत तसेच समर्थकांत कोणताही वादंग उद्भवू नये यासाठी त्या प्रत्येकाला पक्षनिहाय विशिष्ठी ठिकाणीच थांबण्याचा पर्याय देखील वापरला गेला आहे. तर अनेक तालुक्याच्या गावांत खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूकही काही काळासाठी बंद केली आहे. तर काही ठिकणी ती अन्य मार्गे वळविण्यात आलेली आहे.(प्रतिनिधी)