मुंबई - रेल्वे कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, सोमवारी विविध विभागीय रेल्वे व्यवस्थापकांंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एनआरएमयू)तर्फे हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.सोमवारी संघटनेतर्फे सीएसएमटी येथील डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. यात संघटनेचे अध्यक्ष नितीन प्रधान, सरचिटणीस वेणू नायर व इतर पदाधिकारी सहभागी होतील. ८, ९ व १० मे रोजी साखळी उपोषण करण्यात येईल. सीएसएमटी, ठाणे, कुर्ला, दादर, कल्याण, इगतपुरी, लोणावळा यासह विविध प्रमुख स्थानकांवर हे उपोषण करण्यात येईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली.सुरक्षा व्यवस्थेतील दीड लाख रिक्त पदांसहित रेल्वेतील इतर विभागातील एकूण अडीच लाख रिक्त पदे त्वरित भरावीत, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, किमान वेतन व फिटमेंट फॉर्म्युला नव्याने तयार करावा, रेल्वेतील विविध कामांचे होत असलेले आउटसोर्सिंग व खासगीकरण, कंत्राटीकरण त्वरित रोखावे, रनिंग स्टाफचे मायलेज व इतर भत्त्यांबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा, वर्कशॉपमध्ये काम करणाºया कर्मचाºयांच्या इन्सेंटिव्ह व इतर समस्यांची सोडवणूक करावी, वारसांना नोकरी देणाºया लार्सजेस योजनेचे पुनरुज्जीवन करावे, ग्रुप ‘सी’च्या वरील कर्मचाºयांना अपग्रेड करून गॅझेटेड कॅडर ग्रुप ‘बी’मध्ये परावर्तीत करावे, रेल्वे वसाहती, रेल्वे रुग्णालयांमध्ये सुधारणा करावी, अशा विविध मागण्यांसाठी संघटना गेल्या काही काळापासून लढा देत आहे. मात्र, त्याकडे रेल्वे प्रशासनाने पुरेशा गांभीर्याने लक्ष दिलेले नसल्याने, तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा संघटनेने घेतला आहे.सेवानिवृत्त कर्मचाºयांना पुन्हा रेल्वेमध्ये कामावर घेतले जात असल्याने, रेल्वे गाड्यांचे परिचालन व सुरक्षा यामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच कोट्यवधींच्या संख्येने बेरोजगार असलेल्या तरुणांना नोकरी मिळविणे अशक्य होत आहे. त्यामुळे संघटनेने त्याला विरोध केला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आज धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:39 AM