आज डिझेलचे दर तब्बल ६९ रुपयांवर! इतिहासातील उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:47 AM2018-04-03T05:47:43+5:302018-04-03T05:47:43+5:30
इतिहासात प्रथमच डिझेलसाठी मंगळवारी प्रति लीटरसाठी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत. या आधी कधीही डिझेलसाठी इतके पैसे मोजावे लागले नव्हते.
- चेतन ननावरे
मुंबई - इतिहासात प्रथमच डिझेलसाठी मंगळवारी प्रति लीटरसाठी ६९ रुपये मोजावे लागणार आहेत. या आधी कधीही डिझेलसाठी इतके पैसे मोजावे लागले नव्हते. या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘अच्छे दिन’च्या नाऱ्याचा पुरता फज्जा उडाल्याची टीका विरोधक करत आहेत.
या आधी तेल कंपन्यांनी सायंकाळी केलेल्या दराच्या घोषणेनंतर डिझेल पंप चालकांसह वाहतूकदारांचे धाबेच दणाणले. कारण मुंबईत मंगळवारी आकारण्यात येणा-या डिझेलच्या दराने प्रति लीटर ६९.०२ रुपयांचा आकडा गाठला होता. त्यामुळे आजपासूनच वाहतूकदारांनी त्यांच्या दरात वाढ केल्याची माहिती बॉम्बे गुड्स अँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सरचिटणीस अनिल विजन यांनी ‘लोकमत’ला दिली. विजन म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने राजकारण न करता, डिझेलवरील कराचा बोझा कमी करण्याची गरज आहे.
सरकारच्या चुकीच्या दरवाढ धोरणाविरोधात काँग्रेस रस्त्यांवर उतरेल. त्याची घोषणा मंगळवारी केली जाईल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी सांगितले.
गाडीभाडे दरवाढी सुरु
गाडीभाड्यातील ६० टक्के रक्कम ही डिझेलसाठी तर उरलेल्या ४० टक्के भाड्यात टोल, चालकाचा पगार
आणि इतर खर्च केला जातो. डिझेल दरवाढीमुळे वाहतुक भाड्यात वाढ करावी लागते. कंपन्यांसोबत करार केलेले चालक दर तीन महिन्यांनी कराराच्या रकमेत वाढ करतील.
-अनिल विजन, सरचिटणीस, बीजीटीए