आज डॉक्टरांचा संप, नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:20 AM2018-01-02T05:20:04+5:302018-01-02T05:20:19+5:30
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात मंगळवार, २ जानेवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारणार आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात मंगळवार, २ जानेवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास हा विरोध अधिक तीव्र होईल, असा इशाराही इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. संघटनेचे तीन लाख व अन्य सहा लाख डॉक्टर्सनी पाठिंबा दिल्याने या संपात सुमारे १० लाख डॉक्टर्स सहभागी होणार असल्याचे असोसिएशनने सांगितले.
नॅशनल मेडिकल कमिशन बिलाच्या मुद्द्यावरून डॉक्टर आणि केंद्र शासन यांचा संघर्ष सुरू झाला आहे. या बिलामध्ये बºयाच त्रुटी असून त्या सुधारण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने वेळोवेळी यंत्रणांना निवेदन दिले आहे.
यापूर्वी लेखी निवेदन देऊनही कोणतेही कठोर पाऊल उचलले नसल्याने अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनने संप करण्याचा
निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत असोसिएशनतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे. दरम्यान, संपकाळात आपत्कालीन विभाग सुरू राहणार आहे.
विरोध कशासाठी?
या बिलात वैद्यकीय महाविद्यालयांसाठी परवानगीची गरज नाही, ६० टक्के जागांचे शुल्क महाविद्यालय प्रशासन ठरविणार, ४० टक्के जागांवर सरकारी अंकुश, या बिलासाठीच्या समितीत केवळ पाच राज्यांचे सदस्य, वैद्यकीय विद्यापीठांना आपले मत नोंदवण्याचा अधिकार नाही, आयुर्वेद डॉक्टरांना अॅलोपथीच्या प्रॅक्टिससाठी ब्रिज कोर्स अशा चुकीच्या तरतुदींचा समावेश असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
त्यामुळे आम्ही मागच्या काही दिवसांत देशभरातील खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना या बिलाला विरोध करा, अशी मागणी केल्याचे डॉ. वानखेडकर यांनी सांगितले. याविषयी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना यापूर्वीच निवेदन दिले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बिलाविषयीची असोसिएशनची भूमिका मांडणार असल्याचेही वानखेडकर यांनी सांगितले.