Join us

Mumbai Rain Updates: पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची पालिकेच्या शाळांमध्ये निवाऱ्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 6:22 PM

प्रवाशांना बृहन्मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. तसेच पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला देखील बसल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे अनेक कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेले प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले असून या प्रवाशांना बृहन्मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्या 145 शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याची सूचना देत शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी, सतरंजी, बसण्यासाठी खुर्ची किंवा बाक इत्यादी व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी नागरिक अडकल्यास जवळील महापालिकेच्या शाळेत जाण्याची विनंती बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे.

रेल्वे स्थानकाजवळील महापालिकेच्या शाळांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे:

१)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ व नऊच्या प्रवेश द्वारासमोर समोर आणि जीपीओच्या (मोठे पोस्ट ऑफिस) देखील समोर असणार्‍या मनमोहन दास मनपा शाळा

२) मशिद रेल्वेस्थानकाजवळ जेआर मनपा उर्दू शाळा

३) मरीन लाईन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा

४) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा

५) ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा

६) भायखळा स्थानकाजवळ सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा

७) मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा

८) लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील नामजोशी मनपा शाळा आणि साळसेकरवाडी येथील मनपा शाळा

९) दादर पश्चिम परिसरात रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खाना जवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्च जवळ "गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन"

१०) दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जवळ असणारी "दादर वूलन मिल मनपा शाळा"

११) माहीम स्टेशन जवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा

१२) वांद्रे पूर्व परिसरात खेरवाडी मनपा शाळा

१३) सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा

१४) अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा

१५) बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जवळ "सोडावला लेन मनपा शाळा"

१६) बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक 2

१७) घाटकोपर पश्चिम परिसरात साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 2, बरवे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा

१८) गोवंडी स्टेशन जवळ देवनार कॉलनी मनपा शाळा

तसेच गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सकाळी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात होता. मात्र पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे हवामान खात्याकडून आता मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटमहापालिका शाळानगर पालिका