- राज चिंचणकर
मुंबई : नाट्यसृष्टीत गेले काही महिने सर्वाधिक चर्चेचा विषय झालेली, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक आज (दि. ४ मार्च) होत आहे. मुंबईसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांत पार पडणाºया या निवडणुकीमुळे, नाट्य परिषदेच्या आखाड्यात आज धुळवड साजरी होणार आहे. संध्याकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, रात्रीपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे. मतमोजणी लांबली, तर मात्र निकालासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबई शहरात यशवंत नाट्यसंकुल (माटुंगा) व साहित्य संघ मंदिर (गिरगाव), तर मुंबई उपनगरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह (बोरीवली-पश्चिम) व मराठा मंडळ हॉल (मुलुंड-पूर्व) अशी मतदान केंद्रे आहेत. यंदा नाट्य परिषदेच्या करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार, टपाल खाात्यामार्फत मतपत्रिका न पाठवता यंदा प्रथमच मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाचा टक्का किती राहील, हे लक्षात घेणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.४ मार्च रोजी मुंबई (जिल्हा), मुंबई (उपनगर), नागपूर, अकोला, वाशिम, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी निवडणूक होणार आहे, तर ठाणे, पुणे, बीड, नांदेड, जळगाव, लातूर, रत्नागिरी, नाशिक व उस्मानाबाद येथील उमेदवारया आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.या निवडणूक प्रक्रियेत मोहन जोशी यांचा अर्ज बाद झाला असला, तरी त्यांच्या सहकाºयांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत, मोहन जोशी यांच्याच नावे पॅनल उभे केले आहे. अलीकडेच, राज्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असे स्पष्ट करत ‘मोहन जोशी पॅनल’ जोरात आहे, तर ‘आपलं पॅनल’कडे नाट्यसृष्टीतील चमचमत्या ताºयांचा भरणा आहे. नाट्य क्षेत्रातील सर्व स्तरांतल्या उमेदवारांना या पॅनलमध्ये स्थान दिल्याचे प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले आहे. अपक्ष उमेदवारांची मोट बांधणाºया राहुल भंडारे यांच्या टीमने, या दोन्ही पॅनल्सवर टीकेची तोफ डागली असून, आपला स्वतंत्र बाणा दाखवून दिला आहे. ‘नटराज पॅनल’मध्ये केवळ चेहरे नव्हे, तर नाट्यक्षेत्रासाठी काम करणारे हाडाचे कार्यकर्ते असल्याचा या पॅनलचादावा आहे.निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, खºया अर्थाने नाट्य परिषदेच्या भावी अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपली, तरी नाट्य परिषदेचा आखाडा पुढील काही दिवस गाजत राहणार हे निश्चितआहे.मुंबई मध्यवर्तीसाठी यांच्यात चुरसनाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांचे ‘मोहन जोशी पॅनल’ आणि प्रसाद कांबळी व सहकाºयांचे ‘आपलं पॅनल’ यांच्यात मुंबई (जिल्हा) मध्यवर्तीसाठी चुरस आहे. त्यांच्यासह राहुल भंडारे, सुशील आंबेकर व त्यांच्या सहकाºयांनी अपक्ष उमेदवारांसह या निवडणुकीत रंगत आणली आहे. मुंबई उपनगर विभागात ‘आपलं पॅनल’ला प्रदीप कबरे, गोविंद चव्हाण व सहकाºयांच्या ‘नटराज पॅनल’ने आव्हान निर्माण केले आहे.आमची जय्यत तयारी...राज्यातील विविध मतदान केंद्रांवर आमचे अधिकारी पोहोचले आहेत. निवडणुकीसाठी आम्ही जय्यत तयारीत आहोत. काही अनुचित प्रकार घडविण्याचा कुणी प्रयत्न केलाच, तर त्याला तोंड देण्यासाठीही आमची तयारी झाली आहे.- गुरुनाथ दळवी(प्रमुख निवडणूक अधिकारी, नाट्य परिषद)