मुंबई - शारदीय नवरात्रौत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. आज घटस्थापनेचा दिवस असल्याने आजच पहिली माळ घालण्यात येते. त्यामुळे पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे. या दोन्ही मंदिरात कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
यंदाच्या नवरात्रौत्सावाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रींच्या नऊ दिवस नऊ रंग आणि नऊ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे. आज पहिल्या माळेला देवीने निळा रंग परिधान केला आहे. शक्ती आणि श्रेष्ठतेचे प्रतिक असलेल्या या रंगाने नवरात्रौत्सवाची सुरूवात झाली आहे. त्यामुळे आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करुन दुर्गामातेची पूजा करण्यात येत आहे.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात दर तासाला सहा हजार भाविकांचे दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर गर्दी आणि दर्शनाचा ताळमेळ राखण्यासाठी दीड तास मंदिर बंद ठेवण्याचाही निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. राज्यातील या प्रमुख मंदिराची निगराणी सीसीटीव्हीअंतर्गत सुरू आहे. त्यामुळे अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचीही करडी नजर मंदिर परिसरात आहे. दरम्यान, नवरात्रौत्सावानिमित्त सोशल मीडियावरुन उत्साह दिसून येत आहे. नवरात्रौत्साव शुभेच्छांचे मेसेज फॉरवर्ड करुन सणाचा आनंद साजरा होताना दिसत आहे.