आजपासून ‘प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश’, अकरावी प्रवेशाची विशेष फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:48 AM2017-08-20T02:48:36+5:302017-08-20T02:48:40+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, चार प्रवेश फे-यानंतर पाचवी विशेष फेरी राबविण्यात आली. त्यानंतरही तीन हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार, चार प्रवेश फे-यानंतर पाचवी विशेष फेरी राबविण्यात आली. त्यानंतरही तीन हजार विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी आता ‘प्रथम येणाºयास प्रथम प्रवेश’ ही फेरी राबविण्यात येणार आहे. रविवार, २० आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयातील रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
चार फेºयानंतर प्रवेश न घेतलेल्या अथवा प्रवेश न मिळालेल्या १९ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी विशेष फेरीसाठी अर्ज केले होते. चौथ्या फेरीनंतर मुंबई विभागात एकूण ७१ हजार १२३ जागा रिक्त होत्या. त्यापैकी विशेष फेरीत १६ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, पण अजूनही ३ हजार ८० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. यांच्यासाठी शिक्षण उपसंचालक विभाग २० ते २८ आॅगस्टदरम्यान ही फेरी राबविणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांचे ३ गट करण्यात आले आहेत.
पहिल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी २० आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. यानंतर, २१ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आॅनलाइन अर्ज क्रमांक २ भरायचा आहे. हा अर्ज भरून झाल्यावर, २१, २२ आॅगस्टला विद्यार्थी रिक्त जागा असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतात. २२ आॅगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
गट क्रमांक २ साठी मंगळवार, २२ आॅगस्टला महाविद्यालयातील रिक्त जागांची माहिती सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. गट क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांनी २३ आॅगस्टला सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्ज २ भरावयाचा आहे. २३ आणि २४ आॅगस्ट रोजी या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात
प्रवेश घ्यायचा आहे. २४ आॅगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
यानंतर, २४ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. गट ३ मधील विद्यार्थ्यांना २६ आणि २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. रिक्त जागा अधिक असून, विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे या फेरीत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल, असे शिक्षण उपसंचालक विभागाने स्पष्ट केले आहे.
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करायचे आहे.
लॉग इन केल्यावर भाग २ मध्ये चारही शाखा दिसतील. त्यापैकी एक शाखा निवडायची आहे.
महाविद्यालयाच्या कोडसमोर रिक्त जागा दिसतील, तिथे ‘अल्पाय नाऊ’वर क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यावर त्या महाविद्यालयात उपलब्ध जागा असतील, तिथे महाविद्यालयाची संगणक पावती मिळेल. त्याची प्रिंट घेऊन त्याच दिवशी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे.