आज एफवायची पहिली यादी
By admin | Published: June 22, 2017 04:46 AM2017-06-22T04:46:48+5:302017-06-22T04:46:48+5:30
बारावीनंतर मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पूर्वप्रवेश अर्ज भरले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीनंतर मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पूर्वप्रवेश अर्ज भरले आहेत. मुंबई विद्यापीठातील विविध शाखांमध्ये मिळून एकूण तीन लाखांच्या आसपास जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे आता पहिल्या यादीचा कट आॅफ किती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ‘एफवाय’ची पहिली यादी जाहीर होणार आहे.
बारावीनंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी राज्य बोर्डाप्रमाणेच अन्य बोर्डाचे विद्यार्थीही उत्सुक असतात. त्यामुळे नेहमीच उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज येतात. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पूर्वप्रवेश नोंदणी करण्यात आली होती. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय प्रक्रिया पार पडल्याने विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाली आहे.
बुधवारी एफवायच्या प्रवेशासाठी नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३ लाख ३१ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, एकूण ९ लाख ९० हजार २९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सहा शाखांसाठी एकूण २ लाख ९६ हजार ५७३ जागा उपलब्ध असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
२२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली यादी जाहीर झाल्यावर २७ ते २८ जून रोजी दुपारी साडे चार वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरण्यास मुदत देण्यात आलेली आहे. दुसरी यादी २८ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तिसरी आणि शेवटची यादी १ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.