मुंबई : नव्वद टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवूनही अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या जागांच्या नव्या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी दुसऱ्या गुणवत्ता यादीबाहेर राहिले आहेत. याविरोधात विद्यार्थी, पालक शनिवारी आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली बालभवनावर शिक्षण उपमहासंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. उत्तम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी लोढा यांनी केली आहे.कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोटा परत केल्याने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही त्यातून थेट प्रवेश मिळविणे शक्य आहे. उलट दहावीत उत्तम गुण मिळविलेले यादीबाहेर आहेत. त्यांना प्रवेशासाठी वाट पाहावी लागत आहे. या विरोधात हा मोर्चा आहे.अल्पसंख्याक कोट्यात उच्च गुण मिळविलेल्यांना प्रवेश नाकारून शिक्षणाचा हक्क नाकारला जात आहे. दक्षिण मुंबईत अल्पसंख्याक कॉलेज अधिक असल्याने शासनाने याचा पुन्हा विचार करावा, अशी मागणी लोढा यांनी केली. दरम्यान, नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्यांना पसंतीक्रम बदलून तिसºया यादीची वाट पाहावी लागेल. दुसºया यादीत नाव नसल्याने विद्यार्थी-पालकांनी उपसंचालक कार्यालयासमोर गुरुवारी रांगा लावल्या होत्या.
आज अकरावी प्रवेशाविरोधात काढणार मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 6:03 AM