Mahavikas Aghadi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी बाकी असतानाही महाविकास आघाडीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये काही जागांवरून संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी मविआची निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवाराची घोषणा केली असली तरी काँग्रेसनेही या जागेवरील आपला दावा कायम ठेवला आहे. तसंच मुंबईतील काही जागांवरूनही दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झाला आहे. या सगळ्यावर आजच्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न मविआच्या नेत्यांकडून केला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत मविआचा नेमका काय फॉर्म्युला ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, एकीकडे मविआत जागावाटपाचा तिढा कायम असताना दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत मात्र नवनवे मित्रपक्ष जोडले जात आहेत. महायुतीची राज ठाकरे यांच्या मनसेसोबत चर्चा सुरू आहे. तसंच काल रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबत कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं असून महायुतीने आपल्याला एक जागा सोडल्याचं त्यांनी सांगतिलं.
उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवारांची घोषणा करणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवारी यादी उद्या जाहीर केली जाणार आहे. या पहिल्या यादीत १५ ते १६ उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.