मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी नोंद करण्याचा २३ एप्रिल हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभेच्या निवडणुकीची अधिसूचना २६ एप्रिलला जारी होणार असून, यंदा उपनगरात मतदानाची टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असावी, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी उपनगर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारी संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.
१) उपनगरात २६- मुंबई उत्तर, २७ मुंबई उत्तर पश्चिम. २८ मुंबई उत्तर पूर्व, २९ मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात येत्या शुक्रवार (दि.२६ एप्रिल)पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
२) ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ मे रोजी अर्जांची छाननी होईल. ६ मेपर्यंत उमेदवारास अर्ज मागे घेता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मतदारांसाठी वाहतूकसेवा पाचपेक्षा अधिक मतदान -
केंद्रांवर मतदारांची गैरसोय आणि गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी बेस्टच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. गरजू मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी वाहने मोफत चालविली जाणार आहेत.
तपासणीसाठी १२ निरीक्षक -
१) सी- व्हीजिल ॲपवर १८८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच ग्रीव्हन्स ॲपवर २२५१ तक्रारींची दखल घेण्यात आली.
२) यामध्ये धार्मिक चिन्ह संदर्भात एक तक्रार आहे. निवडणुकीच्या काळात ६ सर्वसाधारण, ४ खर्च तपासणी, २ पोलिस असे १२ निरीक्षक या सर्वांवर लक्ष ठेवणार आहेत.
३६९० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग -
चारही मतदारसंघात मतदान केंद्राची ठिकाणे १ हजार ८३ आहेत. मतदान केंद्रांची संख्या ७ हजार ३५३ एवढी आहे. केंद्रावरील सर्व घडामोडीचे वेब कास्टिंग केले जाणार आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग केले जाणार आहे.