Join us

प्रवेशनिश्चितीसाठी आजचा अखेरचा दिवस, अकरावी ॲडमिशन प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:27 PM

ही मुदतवाढ सोमवारी, ३१ जुलै रोजी समाप्त होत असल्याने प्रवेशनिश्चितीचा आजचा दिवस अखेरचा असेल. 

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे ११वी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या विशेष फेरीतील प्रवेश निश्चितीलाही मुदतवाढ दिली गेली होती. ही मुदतवाढ सोमवारी, ३१ जुलै रोजी समाप्त होत असल्याने प्रवेशनिश्चितीचा आजचा दिवस अखेरचा असेल. 

मुंबईसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या झाल्या असून, सध्या पहिली विशेष फेरी सुरू आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत उपलब्ध असणाऱ्या १ लाख ८० हजार ६९७ जागांसाठी एकूण ९३ हजार २०२ विद्यार्थी पात्र होते. त्यांपैकी तब्बल ८० हजार ३९ विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले. त्यांपैकी ५८ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी सायंकाळपर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि कोट्यातील जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ७९ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश रविवारी सायंकाळपर्यंत निश्चित झाले. 

टॅग्स :विद्यार्थीमहाविद्यालय