मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या सोडतीत राज्यातील ६७ हजार ७०६ विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे कागदपत्रांची पडताळणी करून, २६ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करायचे होते, परंतु वेळ अपुरी पडत असल्याने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पालक व संघटनांकडून करण्यात येत होती. पालक व संघटनांच्या मागणीची दखल घेत, शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाला ४ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आरटीई पहिल्या लॉटरीतील प्रवेशासाठी आज शेवटचा दिवस आहे.
२०१९- २० शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेशासाठी राज्यात ९,१९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ७७९ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी २ लाख ४४ हजार ९३३ पालकांनी अर्ज केले.
मुंबईतील ३,५२५ पैकी २,०८० प्रवेश निश्चित३ मे, २०१९ पर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या प्रवेशानुसार, मुंबईतील एकूण ३,५२५ प्रवेशांपैकी २,०८० प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे अद्याप हजाराहून अधिक प्रवेश बाकी आहेत. तरी आजच्या दिवसांत त्यातील बरेचसे प्रवेश निश्चित होतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.