लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाचा वेग वाढवितानाच भविष्यात प्रत्येक मुंबईकराला लस मिळावी, यासाठी महापालिका प्रयत्न करीत असून, आता यासाठी जागतिक निविदा काढण्यात येणार आहेत. याच जागतिक निविदेच्या कामाचा भाग म्हणून मंगळवारी याबाबतच्या निविदा दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याकरिता आतापर्यंत पाच पुरवठादार समोर आले असून, मंगळवारी याबाबत ठोस असा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईत कोरोना लसीचा पुरवठा करण्यासाठी रशियाची वैज्ञानिक संस्था आरडीआयएफकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला. महापालिकेने ११ मे रोजी निविदा काढली. निविदेची तारीख २५ मे रोजी संपत आहे. तत्पूर्वी पाच प्रस्ताव आले आहेत. एक प्रस्ताव रशियन डायरेक्टर इनव्हेस्टमेंट फंडकडून तर दोन खासगी कंपन्यांकडून आले आहेत. तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला देशात परवानगी मिळाली आहे. महापालिका लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.
कोरोना लस खरेदीसाठी स्वतंत्रपणे जागतिक निविदा काढूनही राज्य सरकार आणि पालिकांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, लस खरेदीच्या जागतिक निविदेसाठी केंद्र सरकारने एकसमान धोरण मसुदा जाहीर करावा, अशी मागणीदेखील केली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील आयसीएमआर आणि डीसीजीआयच्या परवानगीशिवाय जागतिक उत्पादक, लस पुरवठा करू शकत नसल्याची बाब अधोरेखित केली जात आहे. लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या वितरणासाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीसाठी विलंब लागत असल्याने निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
लसीकरण केंद्र वाढविण्यावरही भर
मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसींची जागतिक पातळीवरून खरेदी करण्याच्या अनुषंगाने काम केले जात असतानाच, दुसरीकडे लसींची अधिकची गरज पाहता लसीकरण केंद्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासह प्रत्येक झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ड्राईव्ह-इन लसीकरण मोहिमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लस सुलभरीत्या मिळण्यासाठी मदत होत आहे. गृहनिर्माण सोसायट्या आणि रुग्णालयांच्या सहभागातून सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण राबविण्याच्या धोरणासाठी मार्गदर्शक सूचनाही महापालिकेने जारी केल्या आहेत.