Join us

शाळांसाठी आरटीई नोंदणीचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

थंड प्रतिसादामुळे वाढविली होती नोंदणीची मुदतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरटीई जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी राज्यातील खासगी शाळांचा ...

थंड प्रतिसादामुळे वाढविली होती नोंदणीची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आरटीई जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी राज्यातील खासगी शाळांचा प्रतिसाद यंदा लक्षणीयरीत्या घटला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला २१ जानेवारीपासून सुरुवात झाली असताना, मंगळवारअखेर राज्यातील केवळ ६ हजार ००३ शाळांनी नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांकडून मिळणारा हा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन, प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली हाेती.

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेअंतर्गत गेल्या वर्षी (२०२०-२१) राज्यातील ९ हजार ३३१ शाळांनी नोंद केली होती. या शाळांमध्ये एक लाख १५ हजार ४४६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत नोंदणी केलेल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी केवळ ६८ हजार ४४९ जागा खुल्या झाल्या आहेत. शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ९ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार होती; परंतु शाळांकडून नोंदणीला मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याने शिक्षण विभागाने शाळांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर पालकांना या प्रवेशांसाठी अर्ज करण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई जिल्ह्यात गेल्या वर्षी ३६७ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून ७ हजार २ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मुंबईतील ३४६ शाळांनी आतापर्यंत नोंदणी केली असून, शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांची माहिती मिळेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालकांचे लक्ष शाळा नोंदणी आणि उपलब्ध होणाऱ्या जागांकडे लागले आहे.

...............