गिरगावात आज ‘लोकमत आपल्या दारी’
By Admin | Published: June 3, 2016 02:08 AM2016-06-03T02:08:39+5:302016-06-03T02:08:39+5:30
टॅक्सीचालकांचा मुजोरपणा, वाहतूककोंडी, तुंबलेली गटारे, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या दररोज मुंबईकरांना भेडसावत असतात
मुंबई : टॅक्सीचालकांचा मुजोरपणा, वाहतूककोंडी, तुंबलेली गटारे, रस्त्यांची दुरवस्था अशा अनेक समस्या दररोज मुंबईकरांना भेडसावत असतात. ‘लोकमत’ने मुंबईकरांना समस्या मांडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. याच उपक्रमांतर्गत गिरगाव येथे गिरगावकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’तर्फे ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता क्रांतीनगरमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक वसा असलेली मराठी माणसांची वस्ती अशी गिरगावची जुनी ओळख आहे. पण कालानुरूप गिरगावात अनेक बदल होत गेले. जुन्या चाळींची जागा आता टॉवर्स घेऊ लागले आहेत. बदलांबरोबरच काही नवीन समस्याही गिरगावकरांना भेडसावू लागल्या आहेत. पाण्यापासून ते अगदी मेट्रो रेल्वेपर्यंतच्या समस्या गिरगावकरांना भेडसावत आहेत. या समस्यांना वाचा फुटावी म्हणून ‘लोकमत’ आता गिरगावकरांच्या भेटीला येत आहे.
या व्यासपीठावर प्रामुख्याने गिरगावकरांना भेडसावणाऱ्या विषयांचा ऊहापोह केला जाणार आहे. मेट्रो-३ चा मार्ग, वाहतूककोंडी, कचरा, गटारे, झाडांची कमी झालेली संख्या, विहिरी असे अनेक विषय या वेळी मांडले जाणार आहेत. (प्रतिनिधी)