लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फेसबुक लाइव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
अभिषेक शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. मॉरिस आणि अभिषेक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद होते. ते नुकतेच मिटल्याचा दावा केला जात होता. मॉरिस याने गुरुवारी कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर तेथे पोहोचताच त्यांनी गळाभेट घेतली. दोघे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष होता. साडेसातच्या सुमारास आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. दोघांनी एकमेकांमधील गैरसमज दूर करून एकत्र आल्याचे सांगितले.
दोघांमधील संवाद असा
फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेकवर गोळीबार झाला. या चार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गॉड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. घोसाळकर यांनी बोलताना, आज मॉरिस भाईंसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली. अनेक जण सरप्राइज होतील म्हणतात. मॉरिस मध्येच येत, आज बहोत सारे लोग सरप्राइज होगे असे म्हणतो. तसेच काही गोष्टी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असेही बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो.
घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. साडी, रेशन वाटण्याच्या कार्यक्रमाबरोबरच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरू करणार आहोत. नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात, कार्यकर्त्यांमध्ये काही गैरसमज होते. मात्र आता एकत्र येत काम करणार असे ते अभिषेक म्हणाले. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या गेल्या.
nचार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हनंतर ते उठून हसतच बाहेर येण्याचा प्रयत्न करताच, त्यांच्यावर एका मागोमाग एक अशा पाच गोळ्या झाडल्याचे फेसबुक लाइव्हमध्ये दिसते. nत्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना वर्मी लागल्या. एक अगदी जवळून त्यांच्या डोक्याला लागल्याचे समजते. nअभिषेक यांना तातडीने करुणा रुग्णालयात हलविण्यात आले. nअतिरक्तस्रावाने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या गोळ्या मॉरिसने झाडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिल्याचे समजते.
शिवसैनिकांनी केली ताेडफाेडचिडलेल्या शिवसैनिकांनी मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. मॉरिसने कोरोना काळात अनेकांना मदत केली होती. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. अभिषेक यांचा मृतदेह करुणा, तर मॉरिसचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त राजीव जैन यांनी धाव घेतली.