आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:35 AM2017-09-10T03:35:39+5:302017-09-10T03:35:52+5:30
मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत, अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत, अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील जम्बो ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
रेल्वे रुळामधील खडी आणि स्लीपर्स बदलणे, ओव्हरहेड वायरसह सिग्नल यंत्रणेची तपासणी करणे, अशा कामांसाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येतो. याच कामासाठी रविवारी मध्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाºया, सकाळी १०.८ ते दुपारी २.४२ वाजेपर्यंतच्या लोकलला घाटकोपर, विक्रोळी भांडुप, मुलुंड या स्थानकांत विशेष थांबा देण्यात येणार आहे. यामुळे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानी पोहोचतील.
येथे लोकल थांबणार नाही
ब्लॉक काळात नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
कुर्ला ते वाशी ट्रेन नाही
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३७ या काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलहून सुटणाºया डाउन लोकल बंद राहणार आहे. याच मार्गावरील अप लोकल सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ या वेळेत बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेºया चालविण्यात येतील.