आज अखेर मान्सून मुंबईत मनमुराद कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:21 PM2020-06-18T17:21:09+5:302020-06-18T17:21:38+5:30
ऊकाड्याने आणि घामाच्या धाराने मुंबईकरांची आंघोळ होत असतानाच वरुण राजाला अखेर मुंबईकरांची दया आली; आणि...
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने मुंबई वगळता राज्यभरात ठिकठिकाणी आपली हजेरी लावली. केवळ हजेरी नाही तर राज्याच्या बहुतांश भागात मान्सून मनमुराद कोसळला. मात्र ज्या मुंबईने त्याची आतुरतेने वाट पाहिली. त्याच मुंबईकडे मान्सून पाठ फिरवली. आज, उद्या असे करता करता मान्सून मुंबईवर रुसला. मान्सूनचा पुढील प्रवास वेगाने होतानाच निर्धारित वेळेच्या म्हणजे तब्बल एक आठवड्यागोदर मान्सून युपीदेखील दाखल झाला. मात्र मुंबईत त्याचा टिपुसही नाही पडला. ऊकाड्याने आणि घामाच्या धाराने मुंबईकरांची आंघोळ होत असतानाच वरुण राजाला अखेर मुंबईकरांची दया आली; आणि गुरुवारी सकाळी ११ पासून मुंबई शहर आणि उपनगरात मनमुराद कोसळलेल्या मान्सूनने रात्री ऊशिरापर्यंत आपला जोर कायम ठेवला.
गुरुवारी सकाळपासूनच मुंबई शहरावर पावसाचे ढग दाटून आले होते. नेहमी दर्शन देणारा सुर्यनारायण ढगांआडून आज अधून मधून मुंबईकरांना दर्शन देत होता. सकाळी ११ नंतर मात्र मुंबईवर विशेषत: मध्य मुंबईपासून पुढे म्हणजे माहीम, सायन, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, अंधेरी, विद्याविहार, कुर्ला, घाटकोपर, साकीनाका, पवईसह लगतच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. येथून पुढे ३ ते ४ तास म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वत्र थांबून थांबून का होईना पावसाचा जोर कायम होता. विशेषत: दुपारी दिड ते दोनच्या सुमारास पूर्व उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र होते. दुपारी ४ नंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला असला तरीदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु होती. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर, कुर्ला, मुलुंड, मालवणी आणि विक्रोळी येथे ब-यापैकी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, गुरुवारी ४ नंतर मुंबई शहर आणि उपनगरावर पुन्हा पावसाचे ढग दाटून आल्याने सरींनी जोरदार स्वरुप धारण केले होते. दरम्यान, मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो यंदा न्युट्रल आहे. ला निना मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे सर्व घटक असे दर्शवित आहेत की एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येणार आहे.