मुंबई : देश व्यापत चाललेला मान्सून ठिकठिकाणी मनसोक्त बरसत असतानाच मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने पाठ फिरवली आहे. मात्र आता हवामानात होत असलेल्या बदलामुळे शुक्रवार, १९ जुलैपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटने वर्तवलेला अंदाज खरा ठरला तर विदर्भासह मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.स्कायमेटकडील माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण आणि गोवा येथे पावसात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण आणि गोवा वगळता पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कमी राहील. १९ जुलैदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीपासून सरकणाऱ्या चक्रवाती प्रणालीमुळे हा पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात पावसात वाढ होईल. या काळात महाराष्ट्रातील अंतर्गत भागांत मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे.२२ जुलैपर्यंत मुंबईत पावसाचा जोर राहणार नाही. त्यानंतर मुंबई, डहाणू आणि ठाणे या किनारी भागात पावसाची तीव्रता वाढेल. २३ आणि २६ जुलैदरम्यान मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर किनारी भागांत थोड्या फार पावसाची शक्यता आहे.>केरळमध्ये मुसळधारगेल्या २४ तासांत हरियाणा, पूर्व राजस्थान, दिल्ली, केरळ, दक्षिण कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा, आंध्र प्रदेशमध्ये हलक्या पावसाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, ओरिसा, छत्तीसगडसह मध्य प्रदेशमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 6:07 AM