Join us

आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 8:32 PM

झिशान सिद्दिकी यांनी आज यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

Zeeshan Siddique ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व इथं काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट लिहीत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तसंच बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचं राजकारण करण्यात येऊ नये, असं आवाहनही झिशान यांनी केलं आहे.

झिशान सिद्दिकी यांनी लिहिलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "गरीब निष्पाप लोकांचे आयुष्य आणि घरं वाचवताना माझ्या वडिलांनी आपला जीव गमावला आहे. आज माझे कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे, मात्र माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये आणि त्यांचे प्राण व्यर्थही जाऊ नयेत," असं आवाहन झिशान सिद्दिकी यांनी केलं आहे.

पोलीस सहआयुक्तांच्या भेटीत काय घडलं?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांची तासभर विचारपूस केली. यावेळी झिशान यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी झिशान यांना बाबा सिद्दिकी यांचं कोणाशी वैर होतं का? तुमचं कोणाशी वैर आहे का? त्यांना कोणी मारलं असं तुम्हाला वाटतं? तुमचा कोणावर संशय आहे का? असे प्रश्न विचारले आहेत. 

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर शूटर्सनी सहा राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना म्हटलं होतं की, "मला गोळ्या लागल्या आहेत आणि मला वाटत नाही की, मी वाचू शकेन" हेच त्यांचे शेवटचे शब्द असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.  

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईगुन्हेगारी