maharashtra day । मुंबई : आज १ मे रोजी सर्वत्र राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देत आहेत. आज राज्यभर विविध ठिकाणी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हुतात्मा स्मारकावर जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्यावर जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात आला होता. या मोर्चातूनच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने पेट घेतला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी आंदोलकांनी आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळेच, १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र स्वतंत्र झाला.
सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले, "मराठी असण्याचा अभिमान जपणं आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणं हीच महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ ओळख आहे. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"