मुंबई : उपनगरीय रेल्वे तिकीट आणि मासिक पास, तसेच लांब पल्ल्यांच्या अनारक्षित तिकिटांवरील माहिती मराठीत छापण्याच्या निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मंगळवार, १ मे महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता तिकिटावर हिंदी, इंग्रजीसह, मराठीतही माहिती पाहायला मिळेल.सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशनने तब्बल तीन महिन्यांआधीपासून अनारक्षित तिकिटांवर मराठी भाषेत मजकूर छापण्याच्या कामास सुरुवात केली आहे. मराठी भाषेतील मजकुरासह तिकिटाची छपाई करून, याची चाचणीही घेतली आहे. त्यानंतर, मंगळवारी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मराठी भाषेत तिकीट देण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने संबंधित विभागाला दिल्या आहेत.रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणा, लोकलमधील घोषणाही मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून होते. त्याचप्रमाणे, १ मे महाराष्ट्र दिनापासून लोकल, लांब पल्ल्याचे अनारक्षित तिकीट मराठी भाषेत देण्यात येणार आहे.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.
आजपासून रेल्वे तिकिटांवर मराठी भाषेत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:35 AM