Join us  

आज २९५ ग्रामपंचायतींसाठी बंदोबस्तात मतदान

By admin | Published: April 17, 2016 1:14 AM

पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतीमध्ये उद्या रविवारी मतदान होत असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३१५ ग्रामपंचायती पैकी २९५ ग्रामपंचायतीमध्ये उद्या रविवारी मतदान होत असून २ हजार ६४० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. १ हजार ५६ मतदान केंद्रासाठी ७ हजार १०१ ईव्हिएम मशिन्स सीलबंद करून मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आल्या आहेत.पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका उद्या (१७ एप्रिल) रोजी होणार असून १ हजार १६२ प्रभागामधून ३ हजार २६१ उमेदवार निवडून दिले जाणार होते. परंतु काही जागांवर वैधता येणे इ. मुळे आता २९५ ग्रामपंचायतीमधून २ हजार ६४० उमेदवारांसाठी निवडणुका होणार आहेत. पालघर तालुक्यात ५६ ग्रामपंचायतीमधील ५७८ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. परंतु २ ग्रामपंचायतीमधील १६ जागांवर वैधता नसणे, ४ ग्रामपंचायतीमधील ३५ जागा बिनविरोध तर ९४ जागा वैयक्तीक बिनविरोध होणार असल्याने उद्या ५० ग्रामपंचायतीमधून ४२९ उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान होणार आहे. तालुक्यात २०१ मतदान केंद्रासाठी १ हजार ३७७ इव्हिएम मशिन्स पुरविण्यात आल्या असून २२१ मतदान केंद्राध्यक्ष, ६६३ मतदान अधिकारी आणि १४२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. १८ एप्रिल रोजी मतमोजणी जीवन विकास हायस्कूलमध्ये होणार आहे.अप्पर पोलीस अधिक्षकांसह ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १४३ सहा. पो. नि. व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड, दंगल नियंत्रक प्लॅटन इतका बंदोबस्त तैनात आहे.वसई तालुक्यात ११ ग्रामपंचायतीमधील ११९ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. परंतु ४ जागा बिनविरोध निवडून आल्याने उद्या ११ ग्रा. प. मधून ११५ जागांसाठी मतदान होणार आहे. तालुक्यात ४२ मतदान केंद्रासाठी ३८८ ईव्हीएम मशीन पुरविण्यात आल्या असून ४७ मतदान केंद्र प्रमुख व १४१ मतदान अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ एप्रिल रोजी मतमोजणी तहसिलदार कार्यालयात होणार आहे.मोखाडा तालुका२१ ग्रामपंचायतीमधील २१९ जागासाठी निवडणुका होणार होत्या परंतु २ ग्रा.प. मधून १७ वॉर्ड बिनविरोध आणि ५६ वैयक्तीक बिनविरोध निवडून आल्याने उद्या १८ ग्रा. प. मधून १६३ जागासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी पंचायत समिती सभागृहात होणार आहे. डहाणू तालुका६२ग्रामपंचायतीमधील ७१८ जागांसाठी निवडणुका होणार होत्या. त्यापैकी एका ग्रामपंचायतीमधील 0७ जागा अनुसूचित जमातीपैकी नसणे, १३ जागावर नामनिर्देशन पत्र नसणे तर तीन ग्रामपंचायतीमधील जागा बिनविरोध २४ व इतर १२३ वैयक्तीक बिनविरोध निवडून आल्याने आता ५८ ग्रा. प. मधून ५५१ जागासाठी उद्या मतदान होणार आहे. तालुक्यात २३८ मतदान केंद्रासाठी १ हजार २२१ ईव्हिएम मशीन्स पुरविण्यात आल्या असून २६२ मतदान केंद्राध्यक्ष व ७८६ मतदान अधिकारी व २६२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सेंट मेरी हायस्कुलमध्ये होणार आहे.तलासरी तालुका१२ ग्रामपंचायतीमधील १८८ जागासाठी निवडणुका होणार होत्या. त्यापैकी ४ जागा बिनविरोध झाल्याने उद्या १२ ग्रा. प. मधील १८४ जागासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी पि. जे. हायस्कुलमध्ये होणार आहे.वाडा तालुका७० ग्रामपंचायतीमधून ६१२ जागासाठी निवडणुका होणार होत्या. परंतु २ जागावर नामनिर्देशन पत्र नसणे तर ४ ग्रामपंचायतीमधून ३० जागा बिनविरोध निवडून आल्याने उद्या ६६ ग्रामपंचायतीमधून ५८० उमदेवार निवडून देण्यासाठी मतदान होणार आहे. तालुक्यात १९१ मतदान केंद्रासाठी ७५० इव्हिएम मशीनसह २११ मतदान केंद्राध्यक्ष, ६३३ मतदान अधिकारी व २११ कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या असून मतमोजणी पंचायत समितीमध्ये होणार आहे.विक्रमगड तालुका३६ ग्रामपंचायतीमधून ३९२ जागासाठी निवडणुक होणार होत्या. परंतु १ ग्रा. प. मध्ये १७ जागावर नामनिर्देशनपत्र नसणे, ६३ जागा बिनविरोध व वैयक्तीक बिनविरोध झाल्याने उद्या ३५ ग्रामपंचायतीमधून ३१२ जागासाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील १२९ मतदान केंद्रासाठी ५७८ ईव्हिएम मशीनसह १४२ मतदान केंद्राध्यक्ष ४२६ मतदान अधिकारी व १४२ कर्मचाऱ्यांची नेमणूका करण्यात आल्या आहेत. मतमोजणी पंचायत समिती कार्यालयात होणार आहे. जव्हार तालुका४७ग्रामपंचायतीमधून ४३७ जागासाठी निवडणूक होणार होती परंतु ७ जागावर नामनिर्देशन पत्र नसणे, २ ग्रा. प. मध्ये १८ बिनविरोध व १०६ वैयक्तीक बिनविरोध निवडून आल्याने उद्या ४५ ग्रा. प. मधून ३०६ जागासाठी मतदान होणार आहेत. तालुक्यात १३१ मतदान केंद्रासाठी १४४ केंद्राध्यक्ष, ४३२ मतदान अधिकारी व १४४ कर्मचाऱ्यांची नेमणूका करण्यात आल्या असून मतमोजणी आयटीआय संस्थेमध्ये होणार आहे.निवडणूक कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर आबाळ पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकांकरीता शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, १७ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी डहाणू तालुक्यात सोळाशे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. दरम्यान शनिवारी आदल्यादिवशीच कर्मचाऱ्यांचा चमू मतदान केंद्रावर पोहचला असून निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदान केंद्राचा ताबा घेऊन सर्व सज्जता केली आहे. मात्र राहणे, खाणेपिणे आणि आंघोळीच्या गैरसोईचा सामना त्यांना करावा लागत आहे. लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे मतदान पार पाडण्यासाठी महसूल, कृषी, शिक्षण, पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यांना भत्ता देण्यात येतो. तिथूनच त्या दिवशी ज्या मतदान केंद्रावर नियुक्ती केली जाते, त्या ठिकाणी जाऊन संबंधित मतदान केंद्राचा चार्ज घ्यावा लागतो. महत्वाची बाब म्हणजे स्त्री अथवा पुरुष कर्मचाऱ्याला संपूर्ण एक रात्र मतदान केंद्रावरच राहावे लागते. संबंधीत गावातील शाळांच्या वर्गखोल्या निवडणूक मतदान केंद्र म्हणून घेतल्या जातात. तेथे नाश्ता, जेवण आणि आंघोळीची व्यवस्था नसते त्यामुळे एकूण दोन दिवस या कर्मचाऱ्यांना परिसरातील वस्तीवरील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या मदतीवर राहावे लागते. पालघर जिल्ह्यातील काही दुर्गम आदिवासी भागात तर या निवडणूक कर्मचाऱ्यांना जेवण आणि गरम पाणी उपलब्ध न झाल्याने भोजन व स्रानापासून वंचित राहावे लागते. शिवाय निवडणूक कामात कसूर किंवा दिरंगाई केल्यास त्यांच्या विरोधात लोकप्रतींनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १३४ मधील तरतुदींनुसार कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नोकरी टिकविण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सुमारे २४ तास खडतरपणे काम करावे लागते. हे टाळण्यासाठी आयोगाने गांभीर्याने कारवाई करण्याची गरज आहे.