आज प्रचार थांबणार

By admin | Published: June 11, 2015 11:05 PM2015-06-11T23:05:09+5:302015-06-11T23:05:09+5:30

येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेले १० दिवस सुरू असलेल्या प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी होणार आहे. आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर चिखलफेक

Today the promotion will stop | आज प्रचार थांबणार

आज प्रचार थांबणार

Next

वसई : येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेले १० दिवस सुरू असलेल्या प्रचाराची सांगता शुक्रवारी सायंकाळी होणार आहे. आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर चिखलफेक व कुरघोडी करणारी वक्त व्ये इ.चा अपवाद वगळता प्रचार शांततेत झाला. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार करताना सामंजस्य दाखविल्यामुळे निवडणूक तसेच पोलीस यंत्रणेवरही ताण पडला नाही.
प्रत्येक प्रभागातील गल्लीबोळांतल्या मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचले असून मतांचा जोगवा मागताना त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका, प्रलंबित विकासकामे व प्रस्तावित विकासकामे याबाबतचा लेखाजोखा मांडला. या वेळी रिंगणात १० पक्ष असले तरी बहुजन विकास आघाडी व शिवसेना या दोघांमध्येच ‘काँटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे. युतीमध्ये भाजप जरी असला तरी प्रचारादरम्यान भाजपचा प्रभाव कुठेही दिसला नाही. तसेच सेना व भाजप हे दोन्ही पक्ष एकत्रितरीत्या प्रचार करत असल्याचे चित्रही येथील मतदारांना पाहावयास मिळाले नाही. खा. अ‍ॅड. चिंतामण वनगा व पालकमंत्री विष्णू सवरा यांनी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा वाहिली खरी, परंतु त्यांच्या प्रचारामध्ये जान नव्हती. सेनेच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्हा संपर्कप्रमुख अनंत तरे यांना उतरविल्यामुळे प्रचारादरम्यान शाब्दिक संघर्ष अनुभवायला मिळाला. कदम यांच्या घणाघाती टीकेमुळे वसईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री आॅस्कर फर्नाडिस तसेच ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, संजय निरुपम, राजेंद्र गावित यांना प्रचारासाठी उतरविले होते. राष्ट्रवादीकडून मात्र, एकही मोठा नेता प्रचारासाठी आला नाही.
प्रचार समाप्त झाल्यानंतर सर्व पक्ष १४ जून रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी करण्याच्या कामाला लागतील. मतदानाच्या दिवशी दुपारनंतर मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे, या महत्त्वाच्या कामावर आता सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. काही राजकीय पक्षांनी स्वत: मतदारांच्या पावत्या बनविल्या असून त्यांचे वाटप सध्या वेगाने सुरू आहे. मतदार यादीतील गोंधळामुळे काही पक्षांनी ही खबरदारी घेतली आहे. मतदाराला आपले मतदान केंद्र व आपला अनुक्रमांक माहीत असावा, याकरिता या पक्षांनी स्वखर्चाने या पावत्या तयार केल्या आहेत. तसेच मतदानाच्या आधल्या रात्री देवघेवीचे राजकारण होऊ नये यासाठी सर्वच राजकीय पक्ष परिस्थिवर विशेष लक्ष ठेवून आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Today the promotion will stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.