आजपासून प्रचार तापणार
By admin | Published: April 12, 2015 12:07 AM2015-04-12T00:07:41+5:302015-04-12T00:07:41+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रविवारपासून सुरुवात होणार आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी याअगोदरच प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.
कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबई
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रविवारपासून सुरुवात होणार आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांनी याअगोदरच प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. तर बंडखोरीमुळे काहीसे बॅकफूटवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या स्थानिक पुढाऱ्यांनी प्रचारासाठी राज्यातील बड्या नेत्यांना आणण्याचे ठरविले आहे.
मागील वीस वर्षांत केलेली विकासकामे हा राष्ट्रवादीचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. शहरातील प्रशस्त रस्ते, चोवीस तास पाणीपुरवठा, सुसज्ज अशा मलनि:स्सारण वाहिन्या, सांडपाण्यावर प्रक्रिया, घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक तंत्रप्रणाली, अपंगांसाठी शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, स्कायवॉक, नेरूळ येथील चिल्ड्रेन पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्याधुनिक दर्जाचे स्मारक तसेच दर्जेदार आरोग्य सुविधा, नियमित विद्युतपुरवठा आदी मुद्दे प्रचारात राष्ट्रवादीच्या अजेंड्यावर असणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला या कामांचे श्रेय घेता आले नाही. असे असले तरी यावेळी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. माजी मंत्री नाईक यांनी स्वत: आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा स्वीकारली आहे. गरज पडल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची एक सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक व महापौर सागर नाईक यांनी प्रभागांच्या भेटीवर भर दिला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नाईकांवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेना आणि भाजपकडे आता प्रचाराचे मुद्दे उरलेले नाहीत. शिवसेनेने घराणेशाहीला थारा देऊन स्वत:ची नाचक्की करून घेतली आहे. यातच तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना स्थान दिल्याने स्थानिक नेत्यांच्या विरोधात शिवसेनेत असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनीती आखताना शिवसेनेची कसरत होणार आहे. यावर उपाय म्हणून उरलेल्या आठ दिवसांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा घेण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. भाजपकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी चाचपणी सुरू असल्याचे समजते. तर काँग्रेसने माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्यावर निवडणुकीची धुरा सोपविली आहे. त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार आहे. यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे १८ एप्रिलला सभा घेणार आहेत.
च्युतीने झिडकारल्यानंतर स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रिपाइंने १४ उमेदवार उभे केले असून त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे स्वत: चार जाहीर सभा घेणार आहेत. त्याचप्रमाणे शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे सुद्धा प्रचार सभा घेणार असल्याचे समजते.