Join us

'दु:ख होतंय! न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार....'; राहुल कनाल यांनी केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 1:44 PM

आज राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई: माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या म्हणजेच १ जुलै रोजी राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

राहुल कनाल आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री सर्वश्रृत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये पटेनासे झाले आहे. आमच्या मैत्रीत कोणी तरी भांडणं लावून देत असल्याची प्रतिक्रिया राहुल कनाल यांनी व्यक्त केली होती. कनाल हे युवा सेनेचं काम पाहायचे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात अस्वस्थ होते. आज राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. 

युवासेना मध्यवर्ती कार्यालयाचा स्क्रीनशॉट शेअर करत राहुल कनाल म्हणाले की, दु:ख होतंय. हे कोणी केलं चांगलच माहित आहे. पण तुमच्यासाठी ज्यांनी काम केलं, त्यांचं न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे. तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलं आहे. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल कनाल हे वांद्रे पश्चिम मतदारसंघात राहतात. कनाल हे पक्षातून जाणार असल्याने वांद्रे पश्चिम येथील युवा सेनेच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाने ही स्थगिती दिली आहे. कनाल यांच्यासोबत युवा सेनेतून कोण कोण शिंदे गटात जाणार हे पाहिल्यानंतरच युवा सेनेच्या पदांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

कोण आहे राहुल कनाल?

राहुल कनाल हे शिवसेनेचे पदाधिकारी असून राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसेच ते युवासेनाच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना शिक्षण समितीही दिली होती. तसंच श्री साई बाबा संस्थानचे विश्वस्त पदही त्यांचेकडे आहे. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे