Join us

आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी ...

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने नुकतीच टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी १ मार्चपासून होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात ४.६ लाख रिक्षा आणि ६० हजार टॅक्सी आहेत. त्यांना नव्या दराने भाडे आकारण्यासाठी मीटर अद्ययावत करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ७०० रुपयांचा खर्च येणार आहे. नव्या दरानुसार रिक्षाचे किमान रिक्षा भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे २२ वरून २५ रुपये होणार आहे. कूल कॅबसाठी मुंबई महानगर प्रदेशातील भाडे २८ रुपयांवरून ३३ रुपये होणार आहे. मध्यरात्रीपासून पहाटे पाच वाजेपर्यंत रात्रीचे शुल्क लागू होईल.

रिक्षा, टॅक्सी आणि कूल कॅबचे मीटर १ मार्च ते ३१ मे या कालावधीतच अद्ययावत करण्यात येणार आहे. १ जूनपासून केवळ इलेक्ट्रॉनिक मीटरद्वारे भाडे वसूल केले जाईल, असे परिवहन प्रमुख अविनाश ढाकणे यांनी सांगितले, तर वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही रिक्षा आणि टॅक्सींसाठी मीटर अद्ययावत करण्यासाठी एक वेळापत्रक तयार केले आहे; पण कोणत्याही रिक्षा किंवा टॅक्सीसाठी मीटर अद्ययावत होईपर्यंत भाडेपत्रकाचा वापर केला जाऊ शकतो.