Join us

आज शिमग्याची बोंब

By admin | Published: March 12, 2017 6:54 AM

शासह राज्यभरात वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी अथवा शिमगा असे म्हटले जाते.

मुंबई : देशासह राज्यभरात वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी अथवा शिमगा असे म्हटले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात.दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरड्या रंगांची ‘इकोफ्रेंडली’ होळी साजरी करण्याचे आवाहन सर्व स्तरांतून केले जात आहे. रविवारी होळी असल्याने शहर-उपनगरातील विविध संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक दिवस आधीच ‘इकोफ्रेंडली’ होळी साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन व नैसर्गिक रंगांचा वापर करीत पर्यावरणपूरक होळी खेळली, तसेच ‘पाणी वाचवा’ असा संदेश व शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट्स आणि फोटोद्वारे होळी व रंगपंचमीविषयी जनजागृती करणाऱ्या पोस्ट्स शेअर होत आहेत.मुंबईसह राज्यभरात आज होळीच्या रंगांची उधळण होणार आहे. होळीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. होळीनिमित्त संध्याकाळी गोवऱ्याची होळी पेटवून हा सण साजरा केला जाईल. तर मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी बांधव एक दिवस अगोदर मध्यरात्री १२ वाजता होळी पेटवून परंपरेची जपणूक होताना दिसते. (प्रतिनिधी)आरे पोलिसांचा आदिवासी पाड्यांना संदेशहोळी साजरी करा, मात्र झाडे तोडू नका, हा संदेश महापालिकेने मुंबईकरांना दिला आहे. आदिवासी पाड्यात हा संदेश देण्यासाठी आरे पोलिसांनी मोहल्ला कमिटीचा आधार घेतला.आरे परिसरात आदिवासी पाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आजही चूल पेटविण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. होळीसाठीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही मोहल्ला कमिटीमार्फत या ठिकाणी यासंदर्भात माहिती दिली, असे आरे पोलिसांचे म्हणणे आहे. सुकलेल्या आणि गळलेल्या फांद्या, सुकलेली झाडे यांचा वापर करावा. मात्र हिरवीगार झाडे तोडू नका, अशी सूचना केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानगरपालिकेकडून झाडे न तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आदिवासी पाड्यांत माहिती पोहोचण्यासाठी आम्ही बैठका घेऊन संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवीत आहोत, असे आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ओऊळकर यांनी सांगितले.