Join us

आज शोरूम रात्री बारापर्यंत सुरू राहणार

By admin | Published: March 31, 2017 4:29 AM

सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज)मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज)मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने वाहन कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. या प्रकारातील वाहनांचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने बीएस-३ प्रकारातील वाहनांवर कंपन्यांकडून २० ते ३० टक्के सवलत देण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बीएस-३ प्रकारातील वाहनांचा साठा असणारे महाराष्ट्रातील शोरूम वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ३१ मार्च रोजी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (महाराष्ट्र)घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत वाहनांची खरेदीविक्री झाली तर त्यांची नोंदणी नंतरही करता येऊ शकते, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वाहनाच्या इंजिनामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएस या मानांकनात वेळोवेळी सुधारणा होत असते. बीएस-४ हे कमीत कमी वायु प्रदूषण करणारे असून त्यामुळे हे इंजिन वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा फटका बीएस-३ इंजिन असलेल्या वाहनांना बसणार असल्याने वाहन कंपन्यांची एकच धावपळ उडाली आहे. १ एप्रिलपासून अशा वाहनांची खरेदी-विक्री होऊ शकणार नाही. हे पाहता वाहन कंपन्यांनी वाहन खरेदीवर सवलत दिली आहे. ३१ मार्चपर्यंतच ही सवलत असेल. यामध्ये होंडा, टीव्हीएस, महिंद्रा अशा कंपन्यांचा समावेश आहे. होंडाच्या दुचाकींवर पाच हजारांपासून ते १२ हजारापर्यंत तर टीव्हीएसच्या वाहन खरेदीवर १५ हजार ते २0 हजारापर्यंत सवलत देण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंतच बीएस-३ मानांकनातील वाहनांची विक्री होणार असल्याने शोरूममध्ये सवलत दिल्या जाणाऱ्या वाहने खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, फेडरेशन आॅफ आॅटोमोबाईल डीलर्सचे (फाडा) संचालक (आंतरराष्ट्रीय व्यवहार) निकुंज सांघी यांनी सांगितले की, दुचाकी उद्योगात एवढी मोठी किंमत सवलत यापूर्वी कधी ऐकली नाही. सध्या तरी आम्ही जास्तीत जास्त गाड्या विकण्यावर भर दिला आहे. आमचे लोक संभाव्य ग्राहकांना फोन करून सवलतीची माहिती देत आहेत.महाराष्ट्रात जवळपास ५०० डीलर्स आहेत. वाहन चालक, मालकांच्या सोयीसाठी आम्ही शोरूम ३१ मार्च रोजी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य वेळी शोरूम हे रात्री आठपर्यंत बंद होतात. पंरतु ३१ तारखेला रात्री उशिरापर्यंत शोरूम सुरू राहतील. -दिलीप पाटील, अध्यक्ष, आॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र३१ मार्चपर्यंत वाहनांची विक्री झाली तर त्याची नोंदणी आरटीओत नंतरही करता येऊ शकते. परंतु ३१ मार्चनंतर विक्री झाली तर वाहनांची नोंदणी आरटीओत होणार नाही. -प्रविण गेडाम, राज्य परिवहन आयुक्त