Join us

आज शिक्षकांचे मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:55 AM

मुंबई : १९९५-९६ सालापासून शिक्षक म्हणून रूजू असतानाही, १ नोव्हेंबर २००५ला शाळा १०० टक्के अनुदानित नाहीत, हे कारण पुढे करत २००५ सालापासून लागू केलेल्या पेन्शन योजनेतून हजारो शिक्षकांना वगळण्यात आले. त्यामुळे शिक्षण संघर्ष संघटना २६ जुलै रोजी आझाद मैदानात मुंडण आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी सांगितले.मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत संगीता शिंदे बोलत होत्या. आंदोलनात हजारांहून अधिक शिक्षक मुंडण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षात असताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘२००५ला शाळा १०० टक्के अनुदानित नसल्याचे कारण देत, शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अत्यंत अन्यायकारक आहे,’ असे मत अधिवेशनात मांडले होते, परंतु आता सत्तेत आल्यावर शिक्षण खात्याचे मंत्री असूनही तावडे या मुद्द्याला बगल देत आहेत,असे शिंदे यांनी नमूद केले. अन्यायग्रस्त शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.